breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

चंद्रकांत पाटलांच्या ‘डिव्हाईड अँड रुल’ कार्यप्रणालीमुळे भाजपाला धोक्याची घंटा?

भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्रावरील पकड निसटली

पाटलांच्या चुकांमुळे पदवीधर निवडणुकीत फडणवीस अपयशी

पुणे | प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदारसंघासह राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यावर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला. हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा हादरा समजला जात आहे.

विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटलांच्या ‘डिव्हाईड अँड रुल’ या कार्यप्रणालीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाची पकड निसटली असून, आता त्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची तयार झालेली नकारात्म ओळख पक्षाला अडचणीची ठरत आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील अशा दोन पाटील प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुणे पदवीधरचे चंद्रकांत पाटील यांनी १२ वर्षे नेतृत्त्व केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. परंतु, यावेळी भाजपाचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला. त्यामुळे आता पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याहून अधिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपासाठी धोक्याची घंटा मानली आहे. 

विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील यांच्या चुकांमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अपयशाचा सामना करावा लागत आहे.

परिणामी, चंद्रकांत पाटील यांच्या राजकारणातील चुकांबरोबर पक्षातील कार्यपध्दतीचीही चर्चा होऊ लागली असून, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

अतिआत्मविश्वास आणि अहंकारी भाषा…

२०१४ मध्ये केंद्र, राज्यात सत्तेवर असताना आलेला अंहकार भाजपाचे काही नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आजही कायम आहे. तोच अंहकार राज्यातील सत्ता हातून गेल्यावरही दिसतो. विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ‘अनैतिक सरकार’ असे हिणावत महाविकास आघाडीवर टीका केली होती. लोक त्यांना नाकारतील, सर्व जागांवर आम्हीच निवडून येवू, असा अतिआत्मविश्वास व अहंकाराची भाषा ते सतत जाहीरपणे वापरत होते. ते सुशिक्षित मतदारांना रुचले नाही.

कोल्हापूर सोडून कोथरूडची निवड अंगलट….

वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आपले राजकीय मूळ असलेले कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड या सुरक्षित मतदारसंघातून लढले. तेथून ते निवडूनही आले. परंतु, कोल्हापुरात काँग्रेसने चांगली बाजी मारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून निवडून आले नसते म्हणून पुण्यातून लढले, हाच संदेश गेला. निवडणूक लढविताना चंद्रकांत पाटलांनी केलेली ही चूक भाजपला आता महागात पडली. त्यातच भाजपाच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले. त्यांना पदवीधर उमेदवारीचा शब्द दिला. त्यातही डावलले त्यामुळे पुणेकरांमध्ये भाजपाबाबत नकारात्मक संदेश गेला होता.

छोटे नेते…शरद पवारांवर टीका भोवली…

विधानसभा निवडणुकीत आणि नंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून शरद पवार यांनी भाजपाची दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलं. तर त्यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना काय वाटते, हे देखील सर्वश्रृत आहे. तरीदेखील चंद्रकांत पाटालांनी थेट शरद पवारांवर टिका केली. त्यात विधान परिषदेच्या या रणधुमाळीत त्यांनी शरद पवार यांचा ‘छोटे नेते’ असा उल्लेख केला. ही टीका भाजपाला भोवली असल्याचेही या निकालावरून स्पष्ट झाले.

उमेदवार निवडीतही केली चूक…

पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देण्यात चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, उमेदवार निवडण्यात त्यांनी चूक केली. संग्राम देशमुख २०१४ पासून भाजपामध्ये असले, तरी ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. हे पाटलांनी विचारात घेतले नाही. उलट, पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून भाजपाकडे अनेक इच्छूक होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, देशमुख यांना असलेले कारखानदारीचे वलय आणि तेथील अर्थकारणाची चुकीच्या चर्चेचा या निवडणुकीवर परिणाम झाला. याकडे पाटलांनी कानाडोळा केला.

‘वाचाळवीर’ अशी ओळख पक्षाला घातक…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील वारंवार भूमिका मांडतात. पण, त्यांच्या भूमिका, मते कार्यकर्ते आणि लोकांच्या मनाला भिडणाऱ्या नसतात. त्यांत विरोधी नेत्यांबद्दल, राज्यातील प्रश्नांबाबत  नेमकी भूमिका ते मांडत नाहीत. आपणच केलेल्या विधानावरून त्यांना माघार घ्यावी लागते. म्हणूनच, अलिकडे त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेतली जात नसून ‘वाचाळवीर’ अशीच त्यांची ओळख बनली. या निवडणुकीत तेच झाले. ते सतत प्रसारमाध्यमांवर, कार्यक्रमांमधून बोलत असले, तरी त्याचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पाटील विनोदी नेते आहेत. त्यांना मनावर घेऊ नका अशी खिल्ली उडवली आहे.

पदवीधरांसाठी केललं काम सांगता आलं नाही…

पदवीधर मतदारांचे नेतृत्व करत असताना चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय काम केलं?  हे त्यांना या निवडणुकीत सांगता आले नाही. पाच वर्षे हातात सत्ता आणि मंत्री असताना त्यांनी काही केले नाही, हा संदेश त्यातून गेला. तर, दुसरीकडे पदवीधरांसाठी महामंडळ स्थापनेसारख्या भाजपाच्या प्रचारातील घोषणेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाच वर्षात काय केलं? म्हणून घेरले. काम सांगता न आल्यामुळे भाजपाचा आणि पर्यायाने चंद्रकांत पाटील यांचा हा बुरुज ढासळला. तसेच, पाटील यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता एकमेकांत वाद निर्माण होईल, अशी संदिग्ध भूमिका घेतली. परिणामी, पक्षात दुफळी मजली आहे.

 ‘तोडा, फोडा नीती’ अन् कार्यपध्दतीचा फटका….

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची कमान मिळाल्यापासून चंद्रकांत पाटील यांनी तोडा, फोडा आणि राज्य करा, या नितीचा अवलंब केला. त्यातून त्यांनी कोल्हापुरातील स्थानिक राजकारणापासून ते पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी हेच धोरण आखले. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातील मागील काळात त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षात मी सांगेल, तीच पूर्वदिशा या प्रकारची त्यांची कार्यपध्दतीही या पराभवाला कारणीभूत ठरली आहे.

संघटनेत पाटलांकडे कट्टर समर्थकांचा अभाव….

 महाराष्ट्रातील भाजपाच्या संघटनात जनाधार मिळवणा-या लोकांची सुरुवातीपासून चलती आहे. त्यात दिवंगत गोपिनाथ मुंडे, नितीन गडकरींची नावे प्राधान्याने घेतली जातात. राज्यातील मागील पंचवार्षिकमध्ये भाजपाने आयारामांची संख्या वाढवली. त्यात जनाधार, खंदे कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक भाजपाच्या नेत्यांना मिळवता आले नाहीत. ही बाब चंद्रकांत पाटील यांना लागू पडते. ज्या प्रमाणे नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्याकडे समर्थक, कार्यकर्ते दिसतात. तसे चित्र चंद्रकांत पाटलांना निर्माण करता आले नाही.

पक्षात नेतृत्वला मोठं होऊ दिलं नाही….

राज्यात पक्षाची मिळालेली धुरा आणि दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील इतर नेत्यांना जुमानायचे नाही. आपल्याच पक्षातील अनेकांना घरी बसविणे, दूर करण्याचे प्रकार घडवून आणले. पक्षात समांतर नेतृत्व नको. आपल्या वरचढ कोणी होणार नाही, तसेच नवीन नेतृत्व उभं राहणार नाही. यासाठी पाटलांनी कुरघोड्या केल्या. त्याचा देखील व्हायचा तो परिणाम झाला. प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वांना सोबत घेवून जाण्याची भूमिका त्यांची नसल्याने या निवडणुकीत पक्षातील अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली.

सुशिक्षित मतदारांना गृहीत धरण्याचा फॉर्म्युला फसला…

केंद्रात सत्ता स्थापनेपासून भाजपाला देशातील कानाकोप-यात मोदी लाटेवर बळ मिळाले. परिणामी, सर्वच ठिकाणी मोदींच्या नेतृत्वाच्या जोरावर भाजपाकडून मतदारांना गृहीत धरण्याचा फॉर्म्युला वापरला जातो. देशात भाजपाशिवाय पर्याय नाही, असाच प्रचार चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीत केलेला दिसला.  मोदी यांचे नाव वापरून मते मिळविण्याचा हा फॉर्म्युला या निवडणुकीत त्यांना चावलता आला नाही, हेच त्यातून सिध्द झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button