breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गोशाळेच्या माध्यमातून देशी गाईंची नैसर्गिक वृद्धी

दिवाळी म्हणजे झगमगत्या प्रकाशाचा आणि संस्कृतीमधील चांगल्या परंपरांचे जतन करण्याचा सण. अधिक दुधासाठी संकर करून जर्सी गाईंची निर्मिती करण्यावर भर दिला जात असतानाच देशी गाईंची नैसर्गिक पद्धतीने वृद्धी करण्याचे काम श्री स्वामी कृपा गोशाळेच्या माध्यमातून पुण्यात केले जात आहे. देशी गाईंची भावी पिढी सशक्त करण्यासाठी प्रयत्न करतानाच संस्कृती जपण्याचेही काम या माध्यमातून होत आहे. या गोशाळेत सध्या विविध सहा जातींच्या ३५ गाई असून राजस्थानमधील थारपारकर आणि पंजाबमधील साहिवान या जातीच्या गाईंची लवकरच भर पडणार आहे.

वसुबारस सण म्हणजेच सवत्सधेनूपुजनाने रविवारपासून (४ नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) रस्त्यावरील चांदणी चौकापासून जवळच पाऊण एकर जागेवर श्री स्वामी कृपा गोशाळा आहे. जैवविविधता उद्यान (बीडीपी) क्षेत्रातील ही जागा असल्याने येथे बांधकाम होण्याची शक्यता नाही. ही बाब ध्यानात घेऊन कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार मनीषा दाते आणि संतोष वझे गुरुजी यांनी सहा महिन्यांपूर्वी ही गोशाळा सुरू केली आहे. गाईंचा गोठा, शेणखत प्रकल्प आणि चारा लावण्यासाठी नांगरलेली जमीन अशा तीन भागांमध्ये हा प्रकल्प विभागलेला आहे.

देशामध्ये पूर्वी गाईंच्या ११४ जाती होत्या. प्रत्येक गाईच्या दुधाचे खास वैशिष्टय़ असते. काही जातींच्या गाईचे दूध प्राशन केल्यानंतर स्नायू बळकट होतात. तर, काही जातींच्या गाईंचे दूध पायामध्ये ताकद देण्यासाठी उपयोगी ठरते. मात्र, दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी या गाईंचे मोठय़ा प्रमाणावर जर्सी गाईंमध्ये रूपांतर करण्याकडे कल वाढला. यामध्ये देशी गाईंची प्रजा घटली. देशी गाईंची सशक्त प्रजा निर्माण करण्यासाठी गोशाळेबरोबरच नंदशाळा (वळू) असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गाईंच्या वैद्यकीय उपचारांवरचा खर्च आणि पशुवैद्यकांवरील अवलंबित्व कमी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही गोशाळा सुरू केली आहे, अशी माहिती मनीषा दाते यांनी दिली.

गोशाळेतील दूध हे मुख्य उत्पादन म्हणून आम्ही पाहात नाही, तर गोमूत्र आणि शेण याचा अधिकाधिक उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. गाईंना चांगले खायला दिले तर त्यांच्यापासून चांगल्या गुणवत्तेचे दूध मिळते. युरिया या रासायनिक खताचा वापर करून शेतामध्ये ऊस पिकविला जातो. म्हणून आम्ही गाईंना उसाचे वाढे खायला देत नाही. शेंगदाणा-सोयाबीन पेंड, गव्हाचा भुस्सा हा खुराक म्हणून तसेच कडबा खायला घालतो. जर्सी गाईंप्रमाणे या गाईंना वातानुकूलित यंत्रणा लागत नाही, असेही दाते यांनी सांगितले.

तुपाच्या विक्रीतून उत्पन्न

गाईंपासून मिळणाऱ्या दुधाला विरजण लावून गाईचे तूप, सायीला विरजण लावून पारंपरिक तूप आणि ब्राह्म मुहूर्तावर ४० लिटर दुधाला विरजण लावून वैदिक तूप अशा तीन प्रकारच्या तुपाची निर्मिती केली जाते. गाईचे तूप पाचशे रुपये किलो, पारंपरिक तूप दीड हजार रुपये किलो, तर वैदिक तूप तीन हजार रुपये किलो या दराने विकले जाते, असेही मनीषा दाते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button