breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गेट वे ऑफ इंडियावरील धक्का खचला

  • जलपर्यटनाचा थांबा असलेला धक्का बंद करण्याची सूचना

मुंबई : मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेट वे ऑफ इंडियावरील धक्का क्रमांक २ खचून मोठ्ठा खड्डा पडला असून या धक्क्याखालील पर्जन्य जलवाहिनी समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे खचून जमिनीची धूप झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, जलपर्यटनासाठी एक थांबा बनलेला धक्का क्रमांक २ सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्काळ बंद करावा, अशी सूचना पालिकेने पोर्ट ट्रस्टला पत्र पाठवून केली आहे. त्याचबरोबर या धक्क्याच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ धक्क्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेट वे ऑफ इंडिया येथील धक्का क्रमांक २ वरून एलिफंटा येथे जाण्यासाठी बोटी सोडल्या जातात. तसेच जलपर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी याच धक्क्यावरून बोटी सोडण्यात येतात. एलिफंटा येथे जाण्यासाठी, तसेच जलपर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक गेट वे ऑफ इंडिया येथे येत असतात. या पर्यटकांसाठी धक्का क्रमांक २ वरून बोटी सोडण्यात येतात. त्यामुळे धक्का क्रमांक २ वर कायम पर्यटकांची वर्दळ असते.

गेट वे ऑफ इंडिया आणि आसपासच्या परिसरातील पावसाचे पाणी जाण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले असून त्यातून वाहून येणारे पाणी गेट वे ऑफ इंडिया येथील धक्का क्रमांक २ खालून जाणाऱ्या वाहिनीतून समुद्रात सोडले जाते.

समुद्राच्या लाटांचा सतत होणारा मारा आणि पाऊस यामुळे धक्का क्रमांक २ खालील पर्जन्य जलवाहिनीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पर्जन्य जलवाहिनीच्या आसपास धक्क्याची धूप झाली असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परिणामी धक्का क्रमांक २ खचून मोठा खड्डा पडला आहे. खचलेल्या धक्क्याची पालिकेच्या परिरक्षण विभाग आणि पुरातन वास्तुजतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी २८ जून रोजी संयुक्तरीत्या पाहणी केली असून संरचनात्मक सल्लागार शशांक मेहंदळे आणि असोसिएट्स या सल्लागार कंपनीने पाहणी करून आपला अहवाल पालिकेला सादर केला आहे. धक्का क्रमांक २ वरून होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घ्यावी, अशी शिफारस सल्लागार कंपनीने अहवालात केली आहे. या अहवालानुसार पालिकेने धक्का क्रमांक २ वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, असे सूचनापत्र मुंबई पोर्ट ट्रस्टला पाठविले आहे. या धक्क्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या पुरातन वास्तुजतन विभागाने निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर तात्काळ खचलेल्या धक्क्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा धक्का बंद करावा लागणार आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियावरील धक्का क्रमांक ३ वरून जलवाहतूक सुरू करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा आणि भरतीमुळे पाण्याची वाढणारी पातळी यामुळे धक्का क्रमांक २ खाली धूप झाली असून पोकळी निर्माण होऊन धक्का खचला आहे. सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन हा धक्का जलवाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टला पाठविण्यात आले आहे. धक्क्याच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button