breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गडकरी यांचे नेतृत्व धडाडीचे!

रतन टाटा यांचे गौरवोद्गार

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे धाडसी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी काढले. नितीन गडकरी यांच्या चार वर्षांच्या कामगिरीवरील इंडिया इन्स्पायर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात टाटा बोलत होते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुस्तकाचे लेखक तुहीन सिन्हा, बांधकाम व्यावसायिक आणि प्रियदर्शिनी अकादमीचे निरंजन हिरानंदानी हे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही कारणांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली.

गडकरी यांच्याशी गेल्या चाळीस वर्षांचा परिचय असून नव्या भारताच्या उभारणीत पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केल्याचे टाटा म्हणाले. गंगा नदी स्वच्छ करण्याचे काम २०२० मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे नितीन गडकरी यांनी मनोगत व्यक्त करताना जाहीर केले. त्याचबरोबर नवी मुंबईतील विमानतळ सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या चारही दिशांनी जलवाहतुकीचा वापर करून वॉटर टॅक्सीने त्या विमानतळाला जोडणारा प्रकल्प पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी यांनी आता नदी जोड प्रकल्पाचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशातील पाणी टंचाई, पूर या समस्या दूर होतील, असा विश्वस राजीव कुमार यांनी व्यक्त केला. तर नेपोलियनप्रमाणे नितीन गडकरी यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही, असे उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. गडकरी हे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

मंत्र्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यास देशाचा विकास जलद गतीने होईल आणि देश जगात पहिल्या क्रमांकाकडे झेप घेईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मंत्र्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम इंडिया इन्स्पायर्स या पुस्तकामधून होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. इच्छा असेल तरच मार्ग सापडतो अन्यथा फायली अहवाल यातच सरकारचे कामकाज रखडून पडते, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. निरंजन हिरानंदानी यांनी प्रास्ताविक केले. तर पुस्तकाचे प्रकाशक आणि ब्लूम्सबरी प्रकाशनचे प्रमुख राजीव बेरी यांनी आभार प्रदर्शन केले.

‘देशातील ३० टक्के वाहन परवाने बोगस’

वाहन परवाना देण्याची देशातील व्यवस्था कमकुवत असून ३० टक्के वाहन परवाने हे बोगस आहेत. देशात दर वर्षी पाच लाखांहून अधिक अपघात होतात. त्यात लाखो माणसे मृत्युमुखी पडतात. नक्षली कारवाया, दंगली यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण किमान पन्नास टक्क्यांनी कमी करण्याच माझा प्रयत्न असून त्यासाठी रस्ते सुरक्षा विधेयक संसदेत मांडले. ते राज्यसभेत रखडले आहे,’ असे नितीन गडकरी यांनी सांगितले. हे विधेयक लवकर मंजूर झाल्यास अपघातात मरण पावणाऱ्या लाखोंचे प्राण वाचतील असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button