breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गंडा घालण्यासाठी सायबर भामटय़ांच्या नवनवीन क्लृप्त्या

तुलनेत गुन्हे उलगडण्याचा आलेख उतरता

नोकरी, लग्न, रिअ‍ॅल्टी शोमधील बक्षीसाचे आमीष दाखवून फसवणूक

बँक व्यवहारांच्या नावाखाली डेबीट-क्रेडीट कार्डचे तपशील मिळवून गंडा घालण्याबरोबरच नोकरीचे आमीष दाखवून, विवाह नोंदणी संकेतस्थळ, दूरचित्रवाणीवरचे रिअ‍ॅल्टी शो अशा वेगवेगळ्या व अनपेक्षित मार्गानीही लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यात दाखल एकूण सायबर गुन्ह्यंपैकी १४७८ गुन्हे फसवणुकीचे आहेत. मुंबईत फक्त क्रेडिट कार्डशी संबंधित गुन्ह्य़ांची नोंदच जवळपास ४६८ इतकी आहे. या शिवाय इतर ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वेगळे. ऑनलाईन व्यवहारकर्त्यांची वाढती संख्या, गुन्हेगारांकडून पुढे येणाऱ्या नवनव्या संकल्पना आणि त्यापुढे तोकडी पडणारी जनजागृती या कारणांमुळे हे आव्हान पेलणे पोलिसांची डोकेदुखी ठरते आहे.

ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक असलेले पासवर्ड, डेबीट-क्रेडीट कार्डवरील तपशील कोणालाही देऊ नका याबाबत दोनेक वर्षांपुर्वी सायबर पोलिसांसह बॅंकांनी जनजागृती सुरू केली. आमचे अधिकारी फोनवरून कोणतेही तपशील मागत नाहीत, असे लघुसंदेश बॅंकांनी ग्राहकांना धाडण्यास सुरूवात केली. अलीकडे टीव्हीवर जनजागृतीपर जाहिरातीही झळकू लागल्या. मात्र ऑनलाईन फसवणुकीचा आलेख चढाच राहिला. बँक व्यवहारांच्या नावाखाली डेबीट-क्रेडीट कार्डचे तपशील मागण्याचा प्रकार जुनाट ठरावा अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या सायबर भामटय़ांकडून अवलंबल्या जात आहेत. नोकरीचे आमीष दाखवून, विवाह नोंदणी संकेतस्थळांवरून, गुंतवणुकीच्या फसव्या योजनांमधून, रिअ‍ॅल्टी शोमध्ये बक्षीस मिळण्याच्या नावाखाली फसवणूक घडते आहे. त्यामुळे सायबर गुन्हे विशेषत: ऑनलाईन फसवणूक थोपवणे पोलिसांसमोरील नव्या वर्षांतील प्रमुख आव्हान असेल.

यावर्षी कार्ड तपशील मिळवून ग्राहकाच्या बॅंक खात्यातून परस्पर पैसे काढल्याचे ७०७ तर ऑनलाईन बॅंक घोटाळ्यांचे ५६३ गुन्हे राज्यात नोंदवण्यात आले. गेल्या वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीने कळस गाठला. कार्ड घोटाळे १५२२ तर ऑनलाईन बॅंकींग घोटाळे ७७३वर पोहोचले. त्यानंतर जनजागृतीचा परिघ आणि जोर वाढवण्यात आला. मात्र यावर्षी घडलेल्या गुन्ह्यंमुळे जनजागृती तोकडी पडते हे स्पष्ट झाले. यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये २०१७च्या तुलनेत निम्म्याहून जास्त गुन्हे घडल्याची नोंद पोलीस दफतरी आहे. वर्षअखेरीस त्यात आणखी भर पडेल.

सायबर पोलीस, सायबर तज्ञांनुसार गेल्या दोन वर्षांमध्ये मोबाईलद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली. तरुणांसोबत अबाल-वृद्धही या सुलभ व्यवस्थेचा वापर जास्तीत जास्त करू लागले. त्यामुळे दर दिवशी नव्याने किंवा पहिल्यांदाच ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली. त्यासमोर अस्तित्वात असलेली जनजागृतीची व्यवस्था तोकडी पडते आहे.

दुसरीकडे जनजागृतीचे कडे भेदून जास्तीत जास्त ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी घोटाळेबाजांकडूनही नवनवीन क्लृत्प्यांचा वापर होऊ लागला. खरोखरच बॅंकेतून फोन आला हे ग्राहकाला भासवण्यासाठी आयव्हीआर प्रणालीचा वापर भामटय़ांनी केला. अचूकता यावी या उद्देशाने गुगल सर्चने दिलेल्या व्यवस्थेत सहजपणे शिरकाव करून संबंधीत शासकीय, खासगी आस्थापनेच्या नावासमोर भामटय़ांनी स्वत:चा संपर्क क्रमांक देण्यास सुरूवात केली. नावाजलेले ब्रॅण्ड, ऑनलाईन खरेदीसाठी लोकप्रीय अ‍ॅपशी नामसाधम्र्य असलेली बोगस संकेतस्थळे सुरू केली. अशा नवनव्या संकल्पनांआधारे फसवणूक सुरू राहिल्याने त्याआधारे जनजागृती करावी लागेल, जनजागृतीचा भडीमार करावा लागेल, असे मत तज्ञांकडून व्यक्त होते.

१२ टक्के गुन्ह्य़ांची उकल

सायबर गुन्ह्यंचा आलेख चढता आहे तर त्यांची उकल करण्याचा उतरला. यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये दाखलपैकी १२ टक्के गुन्ह्यंची उकल पोलीस करू शकले. २०१५मध्ये हे प्रमाण ३०, २०१६मध्ये २८, २०१७मध्ये १७ टक्के होते. बहुतांश प्रकरणांमध्ये उत्तर भारतातल्या छोटय़ाशा गावात बसून भामटे देशभरातील बॅंक ग्राहकांना लक्ष्य करतात. ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया अनेक महिने सुरू राहते. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख पटतच नाही किंवा पटली तरी त्यांचा ठावठिकाणा हाती लागत नाही. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत याची जाणीव झाल्याने घोटाळेबाज आणखी गुन्हे करतात.

देशभरात १०९ कोटींचा गंडा

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतही सायबर गुन्ह्य़ांचे चित्र उमटले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार २०१७-१८मध्ये देशभरात २,०५९ सायबर गुन्ह्य़ांमध्ये १०९ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. २०१६-१७मध्ये हा आकडा ४२ कोटी इतका होता. त्यावेळी १,३७२ सायबर गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. तर २०१५-१६मध्ये १,१९१ गुन्ह्य़ांमध्ये ४० कोटींना फसविण्यात आले होते.

ऑनलाईन फसवणुकीसाठी भामटय़ांना ग्राहकांच्या कार्डावरील १६ आकडी क्रमांक, सीव्हीही क्रमांक, कार्डाची मुदत आणि मोबाईलवर येणारा ओटीपी म्हणजेच वनटाईम पासवर्ड आवश्यक असतो. हे तपशील मिळवण्यासाठी ते बॅंक अधिकारी असल्याचे भासवून फोन करतात. भीती घालतात, आमीष दाखवतात. कोणत्याही परिस्थितीत हे तपशील कोणालाच द्यायचे नाहीत हे ठरवल्यास फसवणूक टाळता येईल.

– बलसिंग राजपूत, पोलीस अधिक्षक, सायबर महाराष्ट्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button