breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

खड्डे पडले तरी पालिकेचे अ‍ॅप बेपत्ता

तक्रार करण्यासाठी यंत्रणा सुरू करण्यात चालढकल

मुंबई : मुंबईत दररोज ताल धरणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे एव्हाना दिसू लागले असले तरी रहिवाशांना या खड्डय़ांची तक्रार नोंदविण्याची संधी देणारी यंत्रणा सुरू करण्याकरिता मुंबई महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही.

खड्डय़ांच्या तक्रारींसाठी  ‘पॉट होल ट्रॅकिंग सिस्टम’ पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले होते. मात्र खड्डय़ांनी अनेक ठिकाणी मुंबईचा वेग मंदावलेला असतानाही अद्याप पालिकेची यंत्रणा सुरू झालेली नाही. मात्र पालिकेच्या ट्विटर अकाऊंटवर खड्डय़ांविषयीच्या तक्रारींचा आणि ठिकठिकाणच्या खड्डय़ांच्या छायाचित्रांचा पाऊस पडत आहे. मात्र त्यामुळे खड्डय़ांचा एकत्रित आकडा समोर येऊ शकलेला नाही.

सुमारे तीन वर्षांपूर्वी पालिकेने खड्डय़ांच्या तक्रारींसाठी ‘पॉट होल ट्रॅकिंग सिस्टम’ आणली होती. या यंत्रणेमुळे लोकांनी आपल्या मोबाइलवरून खड्डय़ांचा फोटो टाकून तक्रार नोंदवता येत असे. मात्र या पद्धतीमुळे खड्डय़ांचा एकूण आकडा जाहीर होत होता. हजारोंच्या संख्येने खड्डय़ांच्या तक्रारी आल्यामुळे पालिकेवर मोठय़ा प्रमाणावर टीका होऊ लागली. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची कामांवरून सर्वच स्तरांतून पालिकेवर टीका झाली. त्यानंतर पालिकेने ही पद्धतच बंद केली. हेच तंत्रज्ञान पुन्हा आणण्याचे आश्वासन प्रवीण परदेशी यांनी पदभार स्वीकारला तेव्हा दिले होते. मात्र पावसाळा सुरू होऊन खड्डे अवतरले तरी पालिकेची ही यंत्रणा काही अस्तित्वात आली नाही. दरम्यान, खड्डय़ांच्या तक्रारींसाठी असलेल्या जुन्या यंत्रणेत काही चांगले बदल करण्यात येत आहेत, त्यामुळे ही यंत्रणा सुरू होण्यास वेळ लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र तरीही नागरिकांना पालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमाकावर, वॉर्डनिहाय ट्विटर अकाऊंटवर खड्डय़ांच्या तक्रारी विविध मार्गानी करण्याची सोय उपलब्ध आहे, अशीही प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा साठा तयार ठेवला आहे. भर पावसातही चालेल असे कोल्डमिक्स बनवण्याचे परदेशी तंत्रज्ञान पालिकेने आयात केले असून त्यानुसार वरळीच्या प्लाण्टमध्ये त्याचा साठा पावसाळ्यापूर्वीच तयार करून ठेवण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भर पावसात वापरता येईल असे ३९९.४ मेट्रिक टन कोल्डमिक्स तर पाऊस नसताना वापरता येईल असे १०३६ मेट्रिक टन कोल्डमिक्स तयार आहे. या एकून १४३५ मेट्रिक टन कोल्ड मिक्सपैकी १२७४ मेट्रिक टन कोल्डमिक्स पालिकेच्या २४ वॉर्डामध्ये वितरित करण्यात आले आहे. या कोल्डमिक्सच्या वापराचा हिशेब दिल्याशिवाय आणखी कोल्डमिक्स वितरित केले जाणार नाही, असेही पालिके च्या अधिकाऱ्यांनी सागितले आहे. दर आठवडय़ाला प्रत्येक वॉर्डातून कोल्डमिक्सच्या वापराचा हिशेब घेतला जातो. त्यानुसार आतापर्यंत ४०० मेट्रिक टन उत्पादन खड्डे बुजवण्यासाठी वापरले गेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या महिन्यातच एकचतुर्थाश उत्पादन वापरले गेले आहे.

खड्डय़ांना सुरुवात

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी स्थानक पूर्व, जेव्हीपीडी जुहू, घाटकोपरला अनिल उभारे मार्ग, कुर्ला पूर्व येथे नेहरूनगर, चेंबूर पूर्वेला सहकार नगर, माहीम पश्चिमेला दर्गाह स्ट्रीट, चर्चगेटला यलो गेटजवळ पडलेल्या खड्डय़ांचे फोटो नागरिकांनी ट्विटरवर टाकले आहेत. तर अंधेरी पूर्वेकडून आयआयटीकडून जाणाऱ्या मार्गावर १०० पेक्षा अधिक खड्डे पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button