breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन

कोल्हापूर – जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन’ (आय.एस.ओ.) या संस्थेकडून येथील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ- ९००१:२०१५’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ‘आयएसओ’ प्रमाणपत्रामुळे शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ट्यू सूद साऊथ एशिया प्रा.लि. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय वृद्धी) अनिल साळवी आणि कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजीत पाटील उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षाविषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया तसेच पदवी प्रदान प्रक्रिया आदी विविध बाबींची सर्वंकष पाहणी करून ‘आयएसओ’विषयक पाहणी करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ ९००१:२०१५’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेल्या विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. पण, संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातील पहिलेच ठरले आहे, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या प्रमाणपत्राचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button