कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचा संभाजी बिडी विक्रीला कडवा विरोध
कोल्हापूर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या संभाजी बिडीच्या विक्रीला कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडने कडाडून विरोध करून तिची विक्री बंद पाडली. पुण्यावरून कोल्हापुरात आलेला संभाजी बिडीचा टेम्पो त्यांनी स्टेशन रोडवर अडवून त्यांना विकलेला मालही परत घेण्यास भाग पडले.
संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत. त्यांनी जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही. अशा या महापुरुषाच्या नावाने आरोग्याला घातक असलेली बिडी आणि तंबाखूसारखे पदार्थ विकणे गैर आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने कोल्हापुरातील स्टेशन रोडवर संभाजी बिडीचा टेम्पो अडवून तिची विक्री बंद पाडली. कोल्हापुरात संभाजी बिडी विकण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास उग्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला आहे. संभाजी बिडीच्या या टेम्पो चालकाविरोधातही संभाजी ब्रिगेडने लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.