breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या रुग्णालयातून अज्ञाताने चोरल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजी पार्कमधील एका नामवंत रुग्णालयामध्ये घडलेल्या या चोरीबाबत मृत महिलेच्या मुलाने गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

नेज (ता. हातकणंगले) येथील सखुबाई नेजकर-कांबळे (६५) यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने १२ जुलै रोजी दुपारी शिवाजी पार्कमध्ये रुग्णालयात कोरोना संशयावरून उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी रुग्णाला तातडीने ऑक्सिजन व सलाईन लावून उपचार सुरू केले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या कानातील कर्णफुले व पायातील जोडवी काढून नातेवाईकांकडे दिली पण त्याच वेळी त्यांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व दोन्ही हातात एकूण चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या होत्या.

ऑक्सिजन लावल्याने तसेच हाताला सलाईन असल्याने ते दागिने नंतर देऊ, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर रुग्णाचा स्राव घेऊन तपासणीसाठी पाठवला. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता त्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र कोरोना चाचणी अहवाल आला नसल्याने संशयित म्हणून मृतदेह बॅगमध्ये बांधून देण्यात आला. मृतदेहासोबत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दिले पण त्यावेळी पाटल्या नव्हत्या. दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केल्यावेळीच मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वच जण क्वारंटाईन झाले पण सोन्याच्या पाटल्यांबाबत रुग्णालयाच्या प्रशासनाला वारंवार विचारूनही त्यांनी टाळाटाळ केली. अखेर मृताचा मुलगा शीतल याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मृत आईच्या हातातील सोन्याचे दागिने रुग्णालयामधून चोरीला गेल्याची तक्रार दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button