breaking-newsक्रिडा

कोलकाता- पंजाब पुनरागमनासाठी उत्सुक

मोहाली – आयपीएलच्या अकराव्या हंगामात सुरुवातीपासून चांगली कामगीरी करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या पंजाबला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच कोलकातालाही गेल्या सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने त्यांची गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजयपथावर पुनरागमन करण्यास दोन्ही संघ उत्सुक आहेत.

चालू हंगामात कोलकाता आणि पंजाबच्या संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करताना अव्वल 4 संघांत स्थान मिळवले होते. मात्र गेल्या काही सामन्यांत या दोन्ही संघांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आल्याने त्यांना प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यात कोलकाताला उरलेल्या सर्व सामन्यांत विजय मिळवणे आवश्‍यक आहे, तर पंजाबने चारपैकी किमान तीन सामने जिंकल्यासच ते प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरू शकतील.

कोलकाताकडून पूर्वार्धात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा नितीश राणा गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरताना दिसत आहे. तसेच त्यांचे सलामीवीर ख्रिस लिन व सुनील नारायण यांना देखील कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे. त्यातच उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल गेल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नसल्याने त्यांची फलंदाजी मकुवत बनली आहे. कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल हेदेखील चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले असून त्यांचे गोलंदाजही काही विशेष प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे कोलकाताचा संघ अडचणीत सापडला आहे.

दुसरीकडे पंजाबचा संघ गेल्या काही सामन्यांमध्ये सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्यावरच अवलंबून राहिला असल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकेश राहुल वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पंजाबला काही सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास आगामी सामन्यांमध्ये त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ- 
किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.
सामन्याचे ठिकाण- मोहाली, सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button