breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोरोना योध्दा’ डाॅक्टरांची होतेय ससेहोलपट; महापालिकेच्या महासभेकडे लक्ष

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना कायमस्वरुपी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यावरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपसह विरोधी नगरसेवकांनी राजकारण सुरु केले आहे. सध्यस्थिती कोरोना महामारीत अहोरात्र काम करुन जीवावर उदार होत काम करणा-या डाॅक्टरांच्या नियुक्ती देखील अर्थपुर्ण वाटाघाटी झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे वायसीएमच्या डाॅक्टराची ससेहोलपट होवू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उच्चशिक्षित डॉक्टर उपलब्ध व्हावेत या हेतूने तात्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या दुरदृष्टीतून पदव्युत्तर संस्था आकाराला आली होती. या संस्थेसाठी शासनाने 118 पदे भरण्यास मान्यता दिली होती. ही मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेच्या प्रशासन विभागाने 71 अध्यापकांच्या जागेसाठी रितसर भरती प्रक्रिया राबविली होती. या भरतीप्रक्रियेद्वारे जे डॉक्टर अध्यापक म्हणून पात्र ठरले त्यांना रितसर महापालिकेत रुजू करून घेतले. काही महिन्यांपासून हे डॉक्टर आपले काम करीत आहेत. करोनसारख्या महामारीमध्येही या डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांना करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, याच डॉक्टरांना कायम करण्यावरून आता मोठे आणि घाणेरडे राजकारण पालिकेत रंगले आहे. यातील अनेक डॉक्टर हे अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र अनेक वर्षांपासून वासीएम रुग्णालयाला ठेकेदारीचा अड्डा बनविलेल्या काही ठेकेदारांचे हितसंबंध गुंतलेल्या नगरसेवकांना आता हे प्रामाणिक डॉक्टर अडथळा ठरू लागले आहेत. त्यातच यातील एकाही डॉक्टरने आर्थिक देवाण-घेवाणीला सक्त नकार दिल्यामुळेही काहीजणांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेल्यामुळे आता जाणिवपूर्वक डॉक्टरांना कायम सेवेत रुजू करून घेण्यासाठी अडथळे आणले जात असल्याचे बाब समोर आली आहे.

वय, खासगी प्रॅक्टीस अशी कारणे दिली जात असली तरी खरे कारण हे वायसीएममध्ये ठराविक ठेकेदार आणि नगरसेवकांची असलेली दुकानदारी मोडित निघण्याची भिती काहीजणांना असल्यामुळे एक लिस्ट बनविण्यात आली असून दुकानदारीस अडथळा ठरणार्‍या डॉक्टरांना बाजूला ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठेकेदारांचे आणि नगरसेवकांच्या दुकानदारीला पाठिंबा देणार्‍या काहीजणांनी कागदपत्रे व ना-हरकत प्रमाणपत्र अद्यापपर्यंत आलेले नसतानाही त्यांना मात्र कायम केले जाणार आहे. प्रामाणिकपणे सेवा बजाविणार्‍या आणि दुकानदारीस अडथळा ठरणार्‍या या डॉक्टरांबाबत उद्या (बुधवारी) होणार्‍या सर्वसाधारण सभेत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button