breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईस हलगर्जीपणा केल्यास अधिका-यांवर कडक कारवाई

  • आयुक्त राजेश पाटील यांचे अधिका-यांना आदेश

पिंपरी / महाईन्यूज

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी अधिका-यांना दिले. कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोविड-१९  प्रतिबंधात्मक उपाययोजनां संदर्भात आज आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेतील रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील कोरोना रुग्ण संख्या आणि उपाययोजनांचा आढावा आयुक्त पाटील यांनी घेतला. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच महापालिका रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड नियंत्रणासाठी त्यांचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॅब २४ तास कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधितांना आयुक्त पाटील यांनी सूचना दिल्या. नारी सारख्या संस्थेची लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींमार्फत या आजाराचा प्रसार होणार नाही यासाठी कोरोनाबाधित रुग्णाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्येनुसार घर, इमारतीतील काही भाग अथवा संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मास्क न वापरणा-या, थुंकणा-या तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये मार्शल नेमण्यात येणार आहेत. याशिवाय महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांच्या फिरती पथकांद्वारे देखील अशी कारवाई केली जाणार आहे. विनापरवाना लग्न समारंभ वा इतर सोहळ्यांचे आयोजन करणे तसेच परवानगीपेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास अशा समारंभांच्या आयोजकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस आणि महापालिका यांचे संयुक्त भरारी पथक शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यरत असणार आहेत. या भरारी पथकांद्वारे हॉटेल तसेच तत्सम ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्या-यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या भाजी मंडईच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर गर्दी आढळून येईल तसेच कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येईल, अशा भाजी मंडई मोकळ्या मैदानात स्थलांतरित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या. सॅनिटायझर नसणा-या, मास्क विना ग्राहक, कर्मचारी  आढळून येणा-या दुकानांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button