breaking-newsराष्ट्रिय

‘कोणत्याही तेजप्रतापला मी ओळखत नाही’, लालूंच्या मुलाला पोलीस निरीक्षकाने दिले उत्तर आणि…

पत्नी ऐश्वर्या रायबरोबर झालेल्या वादानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव हे घरच्यांपासून वेगळे राहत आहेत. मात्र त्यांनी सक्रीय राजकारणामधील सहभाग वाढवला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामधील एक तक्रार सोडवण्यासाठी तेजप्रताप आणि त्यांच्या समर्थकांनी थेट एका पोलीस स्थानकालाच घेरले. यामुळे फुलवारीशरीफ पोलिस स्थानकामध्ये तणावाचे वातावरण होते. भाच्याला समर्थन देण्यासाठी तेजप्रताप यांचे मामा साधु यादवही पोलीस स्थानकामध्ये उपस्थित होते हे विशेष.

पक्ष कार्यलयात भरवण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये फुलवारीशरीफ येथील मंजू लता या महिलेने तेजप्रताप यांच्याकडे पोलिसांसंदर्भात तक्रार केली. माझ्या बहिणीच्या नवऱ्यानेच तिची हत्या केली असून या संदर्भात आपण पोलिसांकडे तक्रारही केल्याचे तिने तेजप्रताप यांना सांगितले. मात्र तक्रार केल्यानंतरही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने ती जनता दरबारामध्ये आल्याचे तिने तेजप्रताप यांच्या कानावर घातले. महिलेची तक्रार ऐकून घेतल्यावर तेजप्रताप या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांनी फुलवारीशरीफ पोलीस स्थानकाचे मुख्य निरिक्षक मोहम्मद कैसर आलम यांच्या सरकारी क्रमांकावर फोन केला. तेजप्रताप यांनी आपली ओळख सांगितली असता आलम यांनी आपण कोणत्याही तेजप्रतापला ओळखत नाही असं सांगितले. तेजप्रताप यांचे म्हणणे ऐकून घेण्याआधीच आलम यांनी फोन कट केला. पोलीस अधिकाऱ्याच्या या वागणुकीमुळे संतापलेल्या तेजप्रताप यांनी आपल्या समर्थकांसहीत फुलवारीशरीफ पोलीस स्थानक गाठले.

मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पोलीस स्थानकात पोहचताच तेजप्रताप आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेजप्रताप यांनी फोन करुन आपले मामा साधु यादव यांनाही बोलवून घेतले. भाच्याबरोबर झालेला प्रकार ऐकल्यानंतर यादव काही मिनिटांमध्येच आपल्या समर्थकांसहीत पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले. तेजप्रताप आणि यादव यांच्या समर्थकांनी फुलवारीशरीफ स्थानकाचे मुख्य निरिक्षक मोहम्मद आलम यांना निलंबित करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रमाकांत प्रसाद फुलवारीशरीफ पोलीस स्थानकामध्ये पोहचले. प्रसाद यांनी तेजप्रताप आणि यादव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ तासभर चालेल्या या गोंधळानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगत तेजप्रताप आणि यादव हे पोलीस स्थानकामधून निघून गेले.

दुसरीकडे पोलिसांनी फुलवारीशरीफ स्थानकामधील मुख्य पोलीस निरिक्षकांच्या कार्यलयात घुसून गोंधळ घातल्याबद्दल तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तेजपाल यादव यांच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर तेजप्रताप यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button