breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार बारणे जनतेसमोर

शहरातील विविध प्रश्नांवर खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरिकांशी मुक्त संवाद

पिंपरी ( महा ई न्यूज ):- मावळ लोकसभा मतदार संघातून देशाच्या संसदेत नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी केलेली धडपड आणि पोटतिडकीने काम करत तडीस नेलेले प्रश्न, याबाबतचा लेखाजोखा मांडत खासदार श्रीरंग बारणे यांनी जनतेशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून त्याची समाधानकारक उत्तरे दिली. ज्या प्रश्नांवर काम सुरू आहे तसेच पुढील काळात काम करायचे आहे, त्याबाबत त्यांनी नागरिकांना ते सोडविण्याचे आश्वासन दिले. रेल्वे, मेट्रो, पाणीपुरवठा, कचरा, रेडझोन, कामगार, कंपन्या यांसह अन्य विविध विषयांवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आकुर्डी येथे ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जनतेचे प्रश्न समजून घेत त्यांच्याशी चर्चा करताना बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, योगेश बाबर, मधुकर बाबर, गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, विलास भराटे, वैशाली सूर्यवंशी, अनंत को-हाळे, उर्मिला काळभोर, डॉ. सत्यजित पाटील, जितेंद्र ननावरे, बाळासाहेब वाल्हेकर, सचिन काळभोर आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराला पाण्याचा प्रश्न आज भेडसावत आहे. पण या प्रश्नावर मी मागील तीन वर्षांपासून काम करत आहे. त्यासाठी पवना धरणातून तब्बल 40 हजार ट्रक गाळ काढण्यात आला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पण महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा तुटवडा भासत आहे. जेवढे पाणी पवना धरणातून उचलले जात आहे, तेवढे सगळे पाणी शहरापर्यंत पोहोचले तरी सुदधा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पासपोर्ट केंद्र सुरू केले. त्याचा आजवर 60 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. पिंपरी मधील डबघाईला आलेली हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच ए) कंपनीतील कामगारांसाठी 100 कोटी मंजूर करून घेतले. पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गासाठी वारंवार चर्चा करून त्याबाबतची केंद्र स्तरावरील कार्यवाही पूर्ण केली. बोपखेल वासीयांसाठी नवीन पूल बांधण्यासाठी मंजुरी मिळवली. कर्जत तालुक्यातील तुंगी या अतिदुर्गम भागात पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत वीज पोहोचवली. क्रांतिवीर चापेकर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढण्यासाठी स्वातंत्र्यापासून प्रयत्न केले जात होते. पण खासदार बारणे यांनी चार वर्षांच्या कालावधीत क्रांतिवीर चापेकर यांच्यावरील टपाल तिकीटाचे अनावरण केले. रेडझोन बाबतच्या प्रश्नांवर बारणे यांनी समर्पक उत्तरे दिली.  

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना बारणे म्हणाले, “पोलीस प्रशासनात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. एखाद्या गुन्हेगाराला सोडविण्यासाठी काही राजकीय मंडळी पोलिसांना फोन करतात. अशा प्रकारच्या फोनची पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद करून ठेवायला हवी. असे झाल्यास राजकीय हस्तक्षेप कमी होईल. त्यामुळे पोलिसांना आपले काम चोखपणे करण्यासाठी वाव मिळेल आणि गुन्हेगारी कमी होईल. एखादा लोकप्रतिनिधी जर पोलीस प्रशासनावर दबाव आणत असेल तर जनतेने अशा लोकांचे पितळ उघडे करायला हवे.”

शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “देशाची प्रगती होण्यासाठी केवळ नेत्याने जागरूक राहून चालणार नाही. तर जनतेने देखील सतत जागरूक राहायला हवं. ज्यामुळे नेत्याला दरवेळी नवी ऊर्जा मिळेल. सतत काम करण्यासाठी तो नेता प्रयत्नशील राहील. सध्या राजकीय क्षेत्रात बुवाबाजी सुरू झाली आहे. या बुवाबाजी पासून प्रत्येकाने सावध राहायला हवे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा फैरी झाडल्या जातात. पण पूर्ण मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच करतात. त्यात श्रीरंग बारणे हे वरच्या स्थानी आहेत. आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून आणखी त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील काळासाठी तयार होणं, ही खरी कार्यकर्तृत्वाची खूण आहे. देशातील सर्वाधिक धडपड्या खासदार म्हणूनही खासदार बारणे यांची ओळख असल्याचे बानगुडे पाटील म्हणाले.

आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, “आपल्या मतदार संघात सतत प्रवास करत नागरिकांचे प्रश्न जाणून त्याचे समाधान करण्यात खासदार बारणे जास्तीत जास्त वेळ देतात. पिंपरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्यासोबत काम करताना अनुभव येतोच. सतत जनतेच्या विकासाचा ध्यास सुरू असतो. रेल्वे, बोपखेल, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो याबाबतचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. पिढीला काळात मावळ लोकसभा मतदार संघातून जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जनता त्यांच्या पाठीशी राहील. असेही आमदार अॅड. चाबुकस्वार म्हणाले.

नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, “आकुर्डी परिसरात खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे झाली आहेत. आकुर्डीमध्ये पालखी मार्ग घोषित करून त्या मार्गाचा विकास, रुग्णालयाचे काम सुरू आहे. आकुर्डी भाजी मंडईजवळ नवीन पोलीस चौकी सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. उद्यानाचा विकास असे अनेक प्रश्न खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून झाली आहेत.

मधुकर बाबर म्हणाले, “पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना श्रीरंग बारणे यांनी नागरिकांचे प्रश्न अतिशय तळमळीने मांडले. त्याचेच फलित म्हणून जनतेने त्यांना देशाच्या संसदेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले. संसदेत देखील नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत खासदार बारणे काम करत आहेत. त्यामुळेच त्यांना संसदरत्न म्हणून तब्बल चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे. पुढील कालावधीत शिवसेना आणि भाजप यांची युती होईल अथवा न होईल, पण मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार बारणे हेच निवडून येतील, असा विश्वास देखील बाबर यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button