breaking-newsराष्ट्रिय

केरळमधील जीवनदात्या ‘हीरो’चा मदतीअभावी दुर्दैवी मृत्यू

केरळमधील महापुरात अनेकांचा जीव वाचवून हिरो ठरलेल्या जिनेशचा मदत न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिनेशने आपला जीव धोक्यात घालत अनेकांचा जीव वाचवला होता. लोकांना वाचवत असतानाचा त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतली होती. मात्र इतरांना मदत करण्यासाठी धाव घेतलेल्या जिनेशचा मदत न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातानंतर ट्रकने चिरडल्याने जिनेशचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असताना जिनेश मदतीसाठी याचना करत होता. मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही अशी माहिती जिनेशचा मित्र जगनने दिली आहे.

जगन हा जिनेशसोबत दुचाकीवरुन चालला होता. तोल गेल्याने दुचाकीचा अपघात झाला. यावेळी मागून येणारा ट्रक आपला वेग नियंत्रित करु शकला नाही आणि जिनेशच्या अंगावरुन निघून गेला. मदतीसाठी कोणीही थांबलं नाही असं जगन सांगतो. जिनेश फक्त २४ वर्षांचा होता.

‘जिनेशसोबत असं काही होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. त्याला इतरांना मदत करायला आवडायचं. त्याच्या याच सवयीमुळे महापुरात तो हिरो ठरला होता’, असं जगनने सांगितलं आहे. जिनेश आणि त्याच्या मित्रांनी चेनगन्नूर येथे बचावकार्यादरम्यान जवळपास १०० लोकांची सुटका केली होती.

अपघातानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास जवळपास अर्धा तास लागला. यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आला. काही वेळाने जिनेशला मृत घोषित करण्यात आलं. ‘पुरावेळी जेव्हा मदत मागण्यात आली तेव्हा जिनेश आणि त्याच्या सहा मित्रांनी कशाचाही विचार न करता धाव घेतली होती’, असं जिनेशची आई सांगते.

जिनेशला डान्सची आवड होती. तुटलेल्या छप्परखाली तो मित्रांसोबत नेहमी प्रॅक्टिस करत असे. अनेकांनी ज्यांची जिनेशने महापुरातून सुटका केली होती, त्यांनी घऱी येऊन त्याचे आभार मानले होते. मात्र इतरांच्या मदतीला धावणाऱ्या जिनेशच्या मदतीसाठी कोणीच न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button