breaking-newsराष्ट्रिय

केजरीवाल यांच्या नातेवाईकाला घोटाळ्याप्रकरणी अटक

  • सार्वजनिक बांधकाम विभागातले गैरव्यवहार प्रकरण 

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका नातेवाईकाला सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मात्र केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि केजरीवाल यांच्या नातेवाईकाला त्रास देण्यासाठीच ही अटक झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे.

विनय बन्सल असे अटक करण्यात आलेल्या नातेवाईकाचे नाव असून केजरीवाल यांचे मेहुणे सुरेंद्र बन्सल यांचा तो मुलगा आहे. वायव्य दिल्लीतील पितामपूरा भागातल्या घरातूनच त्याला अटक करण्यात आल्याचे “एसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बन्सल यांनी चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला होता. बांधकाम कंपनीचे सक्रिय पार्टनर असल्याचा दावा त्याने पूर्वी केला होता. मात्र त्याच्याकडे संबंधित कंपनीचे 50 टक्के समभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी “एसीबी’ने गेल्यावर्षी 9 मे रोजी तीन “एफआयआर’ दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक “एफआयआर’ सुरेंद्र बन्सल यांच्या रेणू कन्स्ट्रक्‍शन्स या कंपनीविरोधात आहे. याशिवाय कमल सिंह आणि पवन कुमार या दोघांविरोधातही “एफआयआर’दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात “रोडस ऍन्टी करप्शन ऑर्गनायजेशन’चे संस्थापक राहुल शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे. केजरीवाल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून बन्सल यांच्या कंपनीला कंत्राट मंजूर केली आहेत, असा आरोप जैन यांनी केला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही या अटकेवर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली पोलिस आणि “एसीबी’ हे केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांच्या इशाऱ्यावर “आप’च्या नेत्यांना, नेत्यांच्या नातेवाईकांना त्रास देत आहे, असे सिसोदिया म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button