breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्राच्या कामगार कायद्याविरोधात कामगारांचा सार्वत्रिक संप

पिंपरी / महाईन्यूज

देशात कामगार कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केलेले आहेत. कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे. करोना काळातील शांततेचा फायदा घेऊन अत्यंत बेलगामपणे संरक्षण –विमा-बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमदेखील विकून टाकण्याच्या देशविरोधी हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. करोना काळात कोट्यावधींचा रोजगार गेलेला आहे. त्यांना तात्काळ साहाय्य देण्याची गरज आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदे देखील केलेले आहेत. या सर्वांच्या विरोधात देशातील सर्व कामगार आणि शेतकरी दिनांक गुरूवार (दि. 2६) एक दिवसाचा सार्वत्रिक संप करणार आहेत.

मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, व्ही. व्ही. कदम, एस. डी. गोडसे, टी. ऐ. खराडे, दिलीप पवार, वसंत पवार, किशोर ढोकले, अर्जुन चव्हाण, रघुनाथ कुचिक, इरफान सैय्यद, मनोहर गडेकर, अरुण बोराडे, अनिल रोहम, प्रसाद काटदरे, योगेश कोंढाळकर, अरविंद जक्का आदी कामगार नेते उपस्थित होते . 

२६ नोव्हेंबर १९४९  हा घटना समितीमध्ये भारतीय संविधान मंजूर होण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.  केंद्रातील मोदी सरकार हे देशाची केवळ कामगार शेतकऱ्यांच्याच हिताला पायदळी तुडवित आहे  असे नव्हे, तर त्यासाठी घटना मोडीत काढून राज्यांच्या अधिकारावर नांगर फिरवून त्यांची भीषण आर्थिक-राजकीय कोंडी करत आहे. त्याविरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी देखील या संपासाठी २६ नोव्हेंबर हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, युटीयुसी, इत्यादी सर्व केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न तसेच स्वतंत्र  कामगार  संघटना ; तसेच बँका, विमा, वीज मंडळ, संरक्षण इत्यादी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी; अंगणवाडी-आशा, आरोग्य परिचारक, तसेच सर्व योजना कर्मचारी, मार्केट यार्ड संबंधित सर्व कर्मचारी-हमाल आणि घर कामगार  उस्फूर्तपणे, पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. ग्रामीण भागात शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून कृती करणार आहेत.

संपामधील प्रमुख मागण्या आणि सरकारची धोरणे याबाबत कामगार- शेतकऱ्यांना व जनतेला तपशीलवार माहिती देण्यासाठी कृती समितीच्या वतीने एक विशेष पुस्तिका ‘शेतकरी –कामगार विरोधात मोदी सरकार’ ही पुस्तिकादेखील प्रकाशित करून तिच्या १० हजार प्रतींची विक्री आतापर्यंत करण्यात आलेली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात संयुक्त आणि स्वतंत्र पत्रकांद्वारा कामगार-कर्मचाऱ्यांपर्यंत संपाची भूमिका पोचविण्यात आलेली आहे.

सध्याच्या करोना आपत्तीमुळे संपाच्या दिवशी कामगार-कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी बोलावून मोर्चे काढले जाणार नाहीत. त्या ऐवेजी खाली दिलेल्या ठिकाणी कामगार-कर्मचारी तोंडाला मास्क बांधून, रस्त्याच्या दोन्ही बाजूस ओळीने, रहदारीस कोणताही अडथळा न करता, हातात मागण्यांचे फलक धरून काही एकमेकांपासून योग्य त्या अंतरावर  उभे राहतील व  मानवी साखळी करतील, अशी माहिती माजी नगरसेवक कैलास कदम यांनी सांगितली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button