breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन, आज खामगाव येथे होणार अंत्यसंस्कार

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष व सद्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर (67) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. फुंडकर यांच्या अकस्मात निधनाने भाजपाला मोठा धक्का बसला असून राज्याच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला आहे. आज दुपारी विमानाने त्यांचे पार्थिव खामगाव येथे दुपारी एका विमानाने नेण्यात आले. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गुरूवारी पहाटे चार वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सोमय्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने 4 वाजून 32 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बातमी कळताच त्यांनी सोमय्या रूग्णालयात जाऊन फुंडकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, संजय कुटे, मधू चव्हाण, माधव भंडारी, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पांडुरंग फुंडकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1950 रोजी खामगाव तालुक्‍यातील नरखेड या छोट्याशा गावी झाला. त्यांनी भाजपातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळविला होता. भाजपा युवामोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदानंतर भाऊसाहेबांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपाला राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचविले. ग्रामीण भागात भाजपाचा बेस बनविण्यात पांडुरंग फुंडकर यांचा मोलाचा वाटा आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद अशा तिन्ही सदनांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. काही काळ त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याचे पदही भूषविले. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर फुंडकर यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 8 जुलै 2016 रोजी त्यांनी राज्य सरकारमध्ये कृषिमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

पांडुरंग फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. कृषिमंत्री असताना ते मला नियमितपणे भेटत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहतो.
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल

कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकत्र्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. विदर्भातील एक ज्येष्ठ, सहृदयी, मातीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जनतेने सलग तीन वेळा संसदेत प्रतिनिधित्वाची संधी दिली. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात फुंडकर यांची पोकळी सतत जाणवत राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
– शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

राज्याचे कृषीमंत्री, भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी लोकसभा सदस्य पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे एका कुशल संघटकास तसेच शेतीप्रश्नांची जाण असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यास आपण मुकलो आहोत. पक्षसंघटनेत गेली 40 वर्षे आम्ही दोघांनी बरोबरीने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला झालेली दु:खवेदना शब्दात व्यक्त करणे शक्‍य नाही.
– हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा.

शांत, संयमित, निगर्वी, समर्पित कार्यकर्ता, अजातशत्रू व्यक्तिमत्त्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी माझे वैयक्तिक मार्गदर्शक गमावले आहेत. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. परंतु, काळाने अचानक घाला घालून सर्वांचे मित्र असलेले व्यक्तीमत्व हिरावून घेतले.
– राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेता, विधानसभा

पांडुरंग फुंडकर कायम शेतकरी, वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फुंडकर यांनी आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे मंत्री म्हणून काम केले. राजकारणासोबतच कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी फुंडकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
– खासदार अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने शेतकरी आणि सर्व सामान्यांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची थेट नाळ जुळली होती. विरोधी पक्षात असताना त्यांनी खामगाव ते आमगाव अशी शेतकरी दिंडी काढून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकत देवो.
– सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाने मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि कृषी क्षेत्रातील जानकार व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र पारखा झाला आहे. भाऊसाहेब यांचे शेतीशी आणि मातीशी घट्ट नाते होते. शेतकऱ्यांच्या उन्नतीची तळमळ असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाऊसाहेब यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो अशी प्राथना करतो.
– महादेव जानकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री

ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषीविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला आपण कायमचे मुकलो आहोत. फुंडकर यांनी गेली अनेक वर्षे पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्‍य आहे.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button