breaking-newsक्रिडा

कुणीही जिंकले तरी इतिहासच!

प्रथमच विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याच्या ईर्ष्येने इंग्लंड आणि न्यूझीलंड आज झुंज

रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गौरवशाली इतिहासात नव्या विश्वविजेत्याचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. यजमान इंग्लंडला तीनदा आणि न्यूझीलंडला एकदा विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. परंतु यंदा १२व्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाच राष्ट्रांव्यतिरिक्त नवा जगज्जेता नाव कोरणार आहे.

सर एल्फ रामसे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने १९६६च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर कोणत्याही क्रीडा प्रकारात जागतिक वर्चस्व प्रस्थापित करणे इंग्लंडला जमले नाही. मग गॅरी लिनेकर असो किंवा हरी केन, गेली साडेपाच दशके इंग्लंडच्या क्रीडा साम्राज्याला जगज्जेतेपदाचे सूर्यदर्शन झाले नाही. काही दिवसांपूर्वी ‘थ्री लायनेसेस’ (तीन सिंहिणी) हे बिरुद मिरवणाऱ्या इंग्लंडच्या महिला संघाने फिल नेव्हिले यांच्या मार्गदर्शनाखाली आशादायी कामगिरी केली. परंतु उपांत्य फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

आता आयरिश ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ इतिहासाच्या उंबरठय़ावर आहे. क्रिकेट ज्या देशात जन्मले, त्या इंग्लंडला गेली ४४ वर्षे जगज्जेतेपद जिंकता आले नव्हते. त्यामुळे येथील क्रिकेटमय वातावरणाने फुटबॉल, टेनिस आदी खेळांवर मात केली आहे. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडवर साखळीत गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर या संघाने बदललेल्या दृष्टिकोनामुळे त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्याची किमया साधली आहे.

न्यूझीलंड संघाचे विश्वचषक रग्बी स्पध्रेवर वर्चस्व आहे. मात्र क्रिकेटच्या विश्वचषकाचे स्वप्न त्यांना साद घालत आहे. न्यूझीलंड म्हणजे काही सर्वोत्तम खेळाडूंचा उत्तम समन्वय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शैलीदार फलंदाज केन विल्यम्सन शांत चित्ताने या संघाचे नेतृत्व करीत आहे. मागील विश्वचषकात ब्रेंडन मॅक्क्युलमने छाप पाडली होती. त्याच्याहून अधिक सक्षम नेतृत्व विल्यम्सन करीत आहे. कठीण प्रसंगात संघाला तारून नेण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे न्यूझीलंडला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठता आली आहे. गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करणाऱ्या संघातील सहा खेळाडू न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचा हा अनुभव न्यूझीलंडसाठी उपयुक्त ठरेल.

इंग्लंडच्या क्रिकेटसाठी हे विश्वविजेतेपद अत्यंत महत्त्वाचे असेल. गेल्या चार वर्षांची मेहनत, समर्पण आणि योजनापूर्वक कामगिरीचे हे फलित आहे. याच बळावर विश्वविजेतेपद काबीज करण्याची ही नामी संधी आहे. देशभरातून मिळणारा पाठिंबा आत्मविश्वास वाढवणारा आहे.    – ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

माझे पराभवापेक्षा विजयालाच प्राधान्य असते. कठीण अनुभवांतूनच विजयाचे धडे मिळतात. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवू. कारण लॉर्ड्सवर विश्वचषकाचा अंतिम सामना आमच्यासाठी खास आहे. हे विश्वविजेतेपद न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी आशा आहे.    – केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा कर्णधार

पंचरत्न फलंदाज

जॉनी बेअरस्टो (४९६ धावा), जेसन रॉय (४२६ धावा), जो रूट (५४९ धावा), जोस बटलर (२५३ धावा) आणि बेन स्टोक्स (३८१ धावा) अशा ५० षटकांच्या क्रिकेटसाठी साजेशा धडाकेबाज फलंदाजांचा संच त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच या पंचरत्नांच्या बळावर चौथ्यांदा विजेतेपद हुकणार नाही, याची त्यांना खात्री आहे. रूटमुळे इंग्लंड संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. बटलर मोठी खेळी साकारण्यासाठी उत्सुक आहे. मॉर्गननेही (३६२ धावा) आवश्यकतेनुसार आपला खेळ उंचावला आहे.

भक्कम गोलंदाजीचा मारा

इंग्लंडच्या वाटय़ाला प्रथम गोलंदाजी आली, तरी भक्कम गोलंदाजीच्या माऱ्यामुळे त्यांना निर्धास्त राहता येईल. जोफ्रा आर्चर (१९ बळी), मार्क वूड (१७ बळी), ख्रिस वोक्स (१३ बळी) आणि लियाम प्लंकेट (८ बळी) यांनी इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय आदिल रशीदने (११ बळी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील विजयात आपल्या फिरकीची चुणूक दाखवली.

फलंदाजीची भिस्त विल्यम्सन, टेलरवर

यंदाच्या विश्वचषकात विल्यम्सनच्या खात्यावर ५४८ धावा जमा आहेत. त्याला अतिशय तोलामोलाची साथ रॉस टेलरकडून (३३५ धावा) लाभत आहे. न्यूझीलंडने विश्वचषक अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल फक्त विल्यम्सन आणि टेलरच्या बळावर केली आहे, हेच त्यांना महागात पडू शकेल. कारण जेम्स नीशाम (२१३ धावा), कॉलिन डी’ग्रँडहोमी (१७४ धावा), मार्टिन गप्टिल (१६७ धावा), कॉलिन मुन्रो (१२५ धावा) यांच्या कामगिरीत सातत्याचा कमालीचा अभाव जाणवत आहे.

बोल्ट-हेन्री-फर्ग्युसनवर गोलंदाजीची मदार

भारतासारख्या बलाढय़ संघाला उपांत्य फेरीत २४० धावा करू न देण्याचे श्रेय न्यूझीलंडच्या गोलंदाजांना द्यायला हवे. ट्रेंट बोल्ट (१७ बळी) आणि मॅट हेन्रीला (१३ बळी) त्यांच्या त्या कामगिरीची अंतिम सामन्यात पुनरावृत्ती करावी लागेल. साखळी सामन्यांत वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने (१८ बळी) टिच्चून गोलंदाजी केली. याशिवाय मध्यमगती गोलंदाज नीशामसुद्धा (१२ बळी)  अप्रतिम कामगिरी करीत आहे.

खेळपट्टीचा अंदाज : लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. परंतु पावसामुळे गोलंदाजासाठीसुद्धा काही प्रमाणात साथ मिळू शकेल. या मैदानावर झालेल्या विश्वचषकातील चार सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असणार आहे. चार सामन्यांपैकी धावांचा पाठलाग करणाऱ्या तीन संघांचे डाव संपुष्टात आले होते.

 आकडेवारी न्यूझीलंडसाठी अनुकूल

इंग्लंडचे लॉर्ड्सच्या घरच्या मैदानावर पारडे जड असल्याचे मानले जात आहे. परंतु आकडेवारी मात्र न्यूझीलंडसाठी अनुकूलता दर्शवते आहे. इंग्लंडने लॉर्ड्सवरील ५४ सामन्यांपैकी फक्त २४ सामने जिंकले आहेत, तर २७ सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांची विजयाची आकडेवारी ४७.१६ टक्के आहे. परंतु न्यूझीलंडने या मैदानावर चार पैकी तीन सामने जिंकून ७५ टक्के यश मिळवले आहे.

लॉर्ड्सवर पाचव्यांदा अंतिम थरार : इंग्लंडने सर्वाधिक पाच वेळा विश्वचषकाचे यजमानपद मिळवले असून पाचही वेळा अंतिम फेरीचे आयोजन करण्याचा मान ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमने पटकावला आहे. विश्वचषकाची अंतिम फेरी सर्वाधिक वेळा याच मैदानावर रंगली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (१९९२, २०१५) दोन वेळा हा मान मिळाला आहे. भारतात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर (१९८७) आणि २४ वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (२०११) अंतिम फेरीचा थरार रंगला आहे. त्यानंतर पाकिस्तान (लाहोर), दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग) आणि वेस्ट इंडिज (बार्बाडोस) येथे अंतिम फेरी खेळवण्यात आली आहे.

  • स्थळ: लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, लंडन ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १,स्टार स्पोर्ट्स १ हिंदी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button