breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कुंपणच शेण खाते तेव्हा…! परवानाधारकांनी मांडलाय अनधिकृत होर्डिंग्जचा धंदा

वाढीव फलकांवर होणार कारवाई ; सुमारे 250 परवानाधारकांना नोटीस

पिंपरी  पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने अनधिकृत होर्डिंग्जचा धंदा जोरदार सुरू आहे. महापालिका हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग्जचे 1 हजार 172 परवाने अधिकृतरित्या वितरित केलेले असताना शहरात 1 हजार 900 एवढे अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. शहरात अधिकृत अन् अनधिकृत होर्डिंग्ज किती ? हे शोधण्यासाठी महापालिकेचे सर्व्हेक्षण अद्याप सुरु आहे. परंतू, शहरातील बिग इंडिया, धिरेंद्र आऊट डोअर, शुभांगी एजन्सी, शुभम एजन्सी, मोरया एंटरप्रायझेस यासह आदीं होर्डिंग्ज परवानाधारकांनी वाढील फलक उभारले आहेत. त्यामुळे आकाशचिन्ह व परवाना विभागाने प्राथमिक टप्प्यात सुमारे 250 परवानाधारकांना नोटीस बजाविल्या असून कुंपणच शेण खात.. असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्जकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष केले आहे. या अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारल्याने कित्येक वर्षांपासून पालिकेचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. मात्र, होर्डिंग्ज उभारणाऱ्यांना राजकीय नेत्यांचे अभय मिळाल्याने अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढली आहे. अनधिकृत होर्डिंग्जचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरात सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यात त्यांना महापालिका हद्दीतील एकूण 1 हजार 900 होर्डिंग्ज आढळले. तसेच होर्डिंग्ज उभारलेल्या जागा मालकांना महापालिकेने आता नोटीसा बजावून सात दिवसात त्या होर्डिंग्जच्या परवान्याची खातरजमा करण्यासाठी कागदपत्राची मागणी केलेली आहे.

त्यामुळे जागा मालकांने कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित जागा मालकांवर कारवाई होणार आहे. ज्या जाहिरातदार एजन्सीने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक उभा केलेले आहेत. त्यांनी जाहिरात होर्डिंग्जची नोटीस मिळाल्यानंतर जाहिरात होर्डिंग्ज त्यांच्या स्ट्रक्‍चरलसह स्वखर्चाने उतरवून घ्यावा. असेही नोटीसीद्वारे कळविलेले आहे.

तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरात होर्डिंग्ज उभारण्यास 1 हजार 172 जाहिरात एजन्सीला परवानगी दिलेली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील सुमारे 250 जाहिरात एजन्सीने मंजूरी दिलेल्या मोजमापापेक्षा वाढीव फलक लावले आहे. त्या वाढील फलकामुळे महापालिकेचा कोट्यावधीच्या रुपयांच्या उत्पन्नात घट होवू लागली आहे. संबंधित जाहिरात एजन्सीने राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने हे होर्डिंग्ज उभा केलेले आहेत. त्यांनी नोटीस दिल्यानंतर स्वतःहून होर्डिंग्ज काढून न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक अथवा फोजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाढीव होर्डिंग्ज नव्याने मंजूरी घ्यावी लागणार आहे. परंतू, चिंचवड स्टेशन परिसरात भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकांने उभारलेल्या होर्डिंग्जवर देखील कारवाई केली जाणार आहे.

परवानाधारकांना आवाहन…
महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जागेत जाहिरात फलक उभारला आहे. त्या नागरिकांने जाहिरात संस्थेला दिलेला ना हरकत प्रमाणपत्र, जागा मालकीची कागदपत्रे आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे सादर करावीत. तसेच, सदरील जाहिरात फलक व स्ट्रक्‍चरल मंजूर मोजमाप न केल्यास, संबंधित जाहिरात फलक अनधिकृत समजून मंजूर केलेला परवाना रद्द करण्यात येईल. सदर फलक स्ट्‌क्‍चरलसह काढण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाईल. परंतू, महापालिकेला फलक काढण्यास येणारा सर्व खर्च संबंधिताकडून वसुल करण्यात येईल. त्यामुळे परवानाधारकांनी जाहिरात फलकांची कागदपत्रे पालिकेकडे सादर करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button