काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात करणार एनएसजी कमांडो
नवी दिल्ली – आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया या नित्याच्याच झाल्याने देशासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. पण आता दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जात असून त्याचाच एक भाग म्हणून देशाचे प्रति दहशतवाद पथक असलेले राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडोंना पाचारण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
एनएसजीच्या काश्मीरमधील तैनातीसाठी केंद्रीय गृहखात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती देताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी आणि बंडखोरांशी सक्षमपणे लढणे शक्य नसल्याने अनेक अडचणींना राज्यातील सुरक्षा रक्षकांना समोरे जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक शहीद होत आहेत. या पार्श्वभूमीवर थेट दहशतवाद्यांशी सामना करण्याची मोठी संधी एनएसजीसारख्या खास सुरक्षा पथकासाठी असून त्यांचे कौशल्य त्यांना येथे नेमकेपणाने वापरता येणार आहे. त्यामुळे स्थानिक सुरक्षा रक्षकांची जीवितहानीही टाळता येईल.