breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसमध्ये मानाचे पान!

  • नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशीष देशमुख यांना पक्षाकडून महत्त्व

मुंबई – भाजपमध्ये बंडाचे निशाण फडकविणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमध्ये विशेष महत्त्व दिले जात असून, या नेत्यांना दिल्लीतून दिले जाणारे महत्त्व राज्यातील नेत्यांना मात्र फारसे पसंत पडत नाही. पक्षात मानसन्मान दिल्याशिवाय अन्य पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश होणार नाही, हे गृहीत धरून काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे.

भंडारा-गोंदियाचे नाना पटोले यांनी भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्या त्याच दिवशी काँग्रेसचे राज्याचे तत्कालीन प्रभारी मोहन प्रकाश यांनी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून भाजपबाहेर पडल्यानेच बहुधा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटोले यांना भेटीसाठी बोलाविले होते. पटोले यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केल्यावर त्यांना महत्त्व देण्यात आले. अलीकडेच पटोले यांची अ. भा. काँग्रेस समितीच्या शेती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

काटोलचे आशीष देशमुख यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर भाजप आणि आमदारकीचा राजीनामा दिला. लगेचच वर्ध्यात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्या राहुल गांधी यांची भेट मिळाली. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत देशमुख यांना व्यासपीठावर जाण्याची संधी देण्यात आली. पटोले किंवा देशमुख या भाजपमधील असंतुष्टांना पक्षात घेऊन काँग्रेसने वेगळा संदेश दिला आहे. भाजपमधील असंतुष्टांना पक्षाची दारे उघडी असल्याचे या कृतीतून काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

पटोले किंवा आशीष देशमुख हे दोघेही मूळचे काँग्रेसचेच. मंत्रिपद न मिळाल्याने पटोले हे नाराज होते. त्यातच २००८ च्या विधान परिषद निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याचे खापर पटोले यांच्यावर फोडण्यात आले होते. यामुळेच पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आशीष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र. प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आल्यावर पक्षात फारसे महत्त्व न मिळाल्याने रणजितबाबू नाराज होते. त्यातच काटोल या पारंपरिक मतदारसंघात चुलतबंधू व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे मुलाला संधी मिळणे कठीण होते.

देशमुख बंधूमध्ये वाद लावण्यासाठीच भाजपच्या नेत्यांनी आशीष देशमुख यांना जवळ केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत आशीष हे काटोल मतदारसंघातून आपल्या चुलत काका अनिल देशमुख यांचा पराभव करून निवडून आले होते.

खासदारकीचे वेध

’ आशीष देशमुख यांना राहुल गांधी उपस्थित असलेल्या व्यासपीठावर संधी देण्यात आल्याने त्यांना काँग्रेसमध्ये महत्त्व दिले जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे.

’ आघाडीत अनिल देशमुख यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या काटोल मतदारसंघावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही.

’ रणजित देशमुख यांच्या पुत्रासाठी राष्ट्रवादी हा मतदारसंघ कदापि सोडणार नाही. यामुळेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आशीष देशमुख यांची इच्छा आहे.

’ अर्थात नागपूर काँग्रेसमधील कमालीचे वाद लक्षात घेता आशीष देशमुख यांना उमेदवारी मिळणे तेवढे सोपे नाही. राहुल गांधी यांनी आश्वासन दिले असले किंवा पक्षाने तसा निर्णय घेतला तरच उमेदवारी मिळू शकते.

’ नागपूर काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार यांना विरोध आहे. मुत्तेमवार यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. नितीन राऊत हे नागपूरमधून लढण्यास उत्सुक आहेत. राहुल गांधी यांनीच उमेदवारी दिल्यास आशीष देशमुख  हे पक्षात सर्वमान्य उमेदवार होऊ शकतात.

’ रणजित देशमुख आणि नागपूरमधील काँग्रेस नेत्यांमध्ये फार काही सख्य नव्हते. यातूनच रणजितबाबूंच्या मुलाला पक्षात नाहक महत्त्व का द्यायचे, असाही काँग्रेस नेत्यांचा सूर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button