breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेस अनुकूल स्थिती!

भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांचे वक्तव्य

राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यास अनुकूल वातावरण आहे, असे सूचक वक्तव्य कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष सरकारच्या स्थिरतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

येडीयुरप्पा यांनी सांगितले की, कुंदगोळ व चिंचोली येथे आमचे कार्यकर्ते विधानसभा पोटनिवडणुका एकजुटीने लढवत आहेत. या दोन्ही लढती आम्ही मोठय़ा मताधिक्याने जिंकणार आहोत. काँग्रेसने आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला, पण ते बधले नाहीत, अगदी  काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल हेही आमच्या कार्यकर्त्यांना फूस लावून फोडू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे फोडाफोडीचे राजकारण यशस्वी होणार नाही, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते कुंदगोळ येथे पोटनिवडणुकीवेळी स्थानिक भाजप नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता येडियुरप्पा यांनी सांगितले की, पैशाच्या बळावर काहीही करता येईल असे काँग्रेसला वाटत असेल तर ते शक्य नाही. ही निवडणूक आम्ही लोकांच्या प्रेमामुळे जिंकणार आहोत.

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे २० नाराज आमदार काय निर्णय घेतात यावर कर्नाटकातील राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. चिंचोली व कुंदगोळ येथे १९ मे रोजी पोटनिवडणुका होत आहेत. काँग्रेस नेते सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे मत काँग्रेसच्या आमदारांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी व जनता दल धर्मनिरपेक्षचे आमदार अस्वस्थ आहेत.

१० भाजप आमदार संपर्कात -खान

येडियुरप्पा हे सत्तेत येण्याची दिवास्वप्ने पाहात आहेत ,असा टोला काँग्रेसचे नेते बी. झेड. जमीर अहमद खान यांनी केला आहे. उलट भाजपचेच दहा आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केला. आमचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप ते अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. ते आमच्यासाठी नवे नाही, असे खान यांनी स्पष्ट केले. संपर्कात असलेल्या भाजप आमदारांची नावे सांगा असे विचारता, आधी येडियुरप्पा यांना आमच्या आमदारांची नावे सांगू देत, असा प्रतिसवाल खान यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button