करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा – पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई
पिंपरी |महाईन्यूज|
करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात आलेली नाही. नियमांचे उल्लंघन करून गणपती विसर्जन केल्यास त्या मंडळावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी मंडळांना दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोना महामारीने थैमान घातले असून दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. शहरातील ५० टक्के सार्वजनिक गणेश मंडळ गणपती उत्सव साजरा करणार नाहीत. नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी रक्तदान शिबिर किंवा प्लाझ्मा डोनेशन असे उपक्रम घ्यावेत असेही बिष्णोई यांनी आवाहन केले आहे.
करोनामुळे प्रशासनाने काही अटी आणि नियम लागू करून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गणपती बापांची मूर्ती ही ४ फुटांपर्यंतच असावी आणि शहरात संचाबंदी लागू असल्याने बाप्पाची आरती करत असताना केवळ ५ जणांना परवानगी आहे. सार्वजनिक किंवा घरगुती गणपती मंडळांनी जागेवरच गणपती विसर्जन करायचं आहे. यावेळेस ५० टक्के सार्वजनिक गणेश मंडळं यंदा गणपती उत्सव साजरा करणार नाहीत. त्यामुळे विनाकारण गर्दी करून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशा इशारा पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी दिला आहे.