breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कचरा खासगीकरणामुळे पालिकेचे कामगार रिकामटेकडे

मुकादम, मोटर लोडर यांना बसून पगार; अन्यत्र सामावून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

मुंबईतील कचरा उचलणाऱ्या खासगी कंत्राटदारामार्फतच कचरा उलण्यासाठी कामगारही पुरवले जात असल्याने महापालिकेचे मोटर लोडर, मुकादम, वाहनचालक यांना सध्या कोणतेही काम न करता पगार मिळत आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर विभागातील मोटर लोडरवर सफाई कामगारांची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी मुकादम आणि वाहनचालक यांना कामच नाही. उत्पन्नाचे स्रोत कमी होत असताना कंत्राटदाराचे खिसे भरून महापालिकेची तिजोरी रिती करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

मुंबईतील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेने १४ गटांमध्ये निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. यापैकी मुंबईतील कांदिवली (आर/दक्षिण), बोरीवली (आर/मध्य) तसेच दहिसर (आर/उत्तर) या तीन विभागांत खासगीकरण करण्यात आले आहे. कंत्राटदार वाहनांसह मोटर लोडरचाही पुरवठा करणार आहेत, शिवाय कचरा पेटय़ांचाही पुरवठा करणार आहेत. या कंत्राटदारांमार्फत १३ नोव्हेंबरपासून या तिन्ही विभागांमध्ये कचरा उचलण्यास सुरुवात झाली. त्याचा निषेध म्हणून पालिकेच्या कामगारांनी संप पुकारला. यशस्वी तडजोडीनंतर हा संप मागे घेण्यात आला.

खासगीकरणामुळे या तिन्ही विभागांतील ३७६ मोटर लोडर, १४० मुकादम, सुमारे १०० वाहनचालक, तांत्रिक कामगारांसह सुमारे १००० कंत्राटी कामगार हे बिनकामाचे ठरले आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ३७६ मोटर लोडरचे पुनर्वसन सफाई कामगार म्हणून करून त्यांच्या हाती झाडू दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. मुकादम आणि वाहनचालकांसहित अनेकांचे पुनर्वसन झालेले नाही. कंत्राटदारासाठी कामगारांना वाऱ्यावर सोडणे निंदनीय असल्याचे ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’चे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी म्हटले आहे. हे सर्व कामगार बसून पगार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी महापालिकेची लूट करणाऱ्यांना प्रशासन आणि स्थायी समिती सहकार्य करत असल्याचा आरोप होत आहे.

मुंबईतील प्रत्येक रस्त्यासाठी सफाई कामगार ठरलेला आहे. रस्त्यांत वाढ  झालेली नाही. मग ३७६ मोटर लोडरना सफाई कामगार म्हणून कुठे सामावून घेणार, असा सवाल करण्यात येत आहे. मुकादम व वाहनचालकांचाही तोच प्रश्न आहे. मोटर लोडर आणि सफाई कामगार यांचा हुद्दा वेगवेगळा असून असा हुद्दा बदलताना मान्यताप्राप्त कामगार संघटनेला विचारातही घेण्यात न आल्याने आपण याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

सध्या १८ ते २० कामगारांमागे एक मुकादम असतो. ते प्रमाण कमी करून १० कामगारांमागे एक मुकादम ठेवण्यात येणार आहे. वाहनचालक व तांत्रिक कामगारांना मालाड व गोरेगाव या विभागांतील कचरा वाहनांतील कामांसाठी सामावून घेतले जाणार आहे.     – विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button