breaking-newsराष्ट्रिय

ओदिशात आठवडाभरानंतरही जनजीवन विस्कळीत

फॅनी चक्रीवादळामुळे वीज, पाणीपुरवठा खंडित; संतप्त नागरिकांची निदर्शने

ओदिशातील फॅनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागांतील जनजीवन सरकारच्या प्रयत्नानंतरही विस्कळीत आहे. आठवडाभरानंतरही वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने शुक्रवारी अनेक ठिकाणी संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. बचाव आणि पुनर्वसन कार्याला गती देण्यासाठी चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पाच जिल्हय़ांतील सरकारी कार्यालये शनिवारी आणि रविवारीदेखील खुली राहणार असल्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले.

फॅनी चक्रीवादळ मे ३ रोजी ओदिशात थडकले होते. आठवडाभरानंतरही भुवनेश्वरमधील निम्म्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत आहे. चक्रीवादळामुळे १.५६ लाख विजेचे खांब उद्ध्वस्त झाले.  भुवनेश्वरमध्ये संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करीत रस्ता रोको आंदोलन केले. निदर्शनकर्त्यांनी भुवनेश्वर येथील केंद्रीय विद्युतपुरवठा केंद्रावर (सीईएसयू) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच राहणे भाग पडले.

संतप्त निदर्शनकर्त्यांनी आम्हाला धमकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने आम्ही पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली असल्याची माहिती येथील विद्युतपुरवठा अधिकारी एन के साहू यांनी दिली. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणी वीज केंद्रांवरदेखील घडल्या असून सीईएसयूचे नियंत्रण कक्ष इतर केंद्रांवर सावधगिरी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

५० टक्के वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचे मुख्य सचिव ए पी पधी यांनी म्हटले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही आरखडा तयार केला असून यासाठी इतर राज्यांतून अधिक मनुष्यबळ मागवले आहे,असेही त्यांनी सांगितले. माहिती आणि जनसंपर्क सचिव संजय सिंह यांनी रविवापर्यंत भुवनेश्वरमधील १०० टक्के वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

कटकमध्ये शनिवारी वीजपुरवठा पूर्ववत होणार असून चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पुरीत पुनर्वसनाचे काम १२ मेपासून सुरू होणार आहे.

फॅनी वादळाच्या तडाख्यापासून केवळ १४ टक्केच मोबाइल मनोरे बचावले असल्यामुळे दूरसंचार सेवा पूर्ववत करायला वेळ लागत असल्याचे सिंह यांनी सांगितले. पुरीमध्ये लॅण्डलाइन फोन सुविधा हळूहळू सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

३ मे रोजी फॅनी चक्रीवादळ ओदिशात थडकल्यामुळे १४ दीड कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले. या चक्रीवादळामुळे वीज, पाणीपुरवठा, दूरध्वनी सेवा यांसारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला. वादळामुळे ४१ लोकांचा मृत्यू झाला असून ५.०८ लाख घरांचे नुकसान झाले. तसेच १४ जिल्ह्य़ांतील ३४.५६ लाख पशूंचा मृत्यू झाला असल्याचे विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button