breaking-newsक्रिडा

ऑलिम्पिकमध्ये कसर भरून काढेन!

आठवडय़ाची मुलाखत: दत्तू भोकनळ, नौकानयनपटू

आशियाई क्रीडा स्पध्रेत सिंगल स्कलमध्ये तांत्रिक कारणासह आजारपणामुळे हुकलेल्या पदकाची कसर मी ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे भरून काढेन, असा विश्वास अव्वल नौकानयनपटू दत्तू भोकनळने व्यक्त केला.

‘‘इंडोनेशियात वैयक्तिक स्पर्धेच्या आधी माझ्या अंगात १०४ ताप होता. त्यात माझ्या शर्यतीला प्रारंभ होण्यापूर्वी सराव करताना तांत्रिक बिघाडामुळे माझी बोट उलटून मी पाण्यात पडलो. त्यामुळे सिंगल स्कलच्या वैयक्तिक प्रकारात माझे सुवर्ण हुकल्याची खंत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांघिकमध्ये उतरलो, तेव्हादेखील अंगात ताप होता. पण त्यावेळी मी निर्धाराने संपूर्ण ताकद पणाला लावून देशाला सांघिक सुवर्ण मिळवून देऊ शकल्याचा आनंद आहे,’’ असे सिंगल स्कलमधील अग्रमानांकित दत्तूने सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये दत्तू देशाला सुवर्णपदक मिळवून देईल, असा सर्वाना विश्वास होता. पण आजारपणामुळे आलेला अशक्तपणा आणि त्यात तांत्रिक बिघाडाचा फटका बसल्याने दत्तूला त्या प्रकारात कोणतेच पदक मिळू शकले नाही. मात्र त्यामुळे निराश न होता, त्याने जिद्दीच्या बळावर देशाला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले. त्या पाश्र्वभूमीवर दत्तूशी झालेला हा मनमोकळा संवाद-

  • आशियाई स्पर्धेत अनपेक्षितपणे सांघिक सुवर्ण मिळाले, पण वैयक्तिकमध्ये हक्काचे सुवर्णपदक हुकले, तेव्हा नक्की काय भावना होत्या?

वैयक्तिक सिंगल स्कलच्या स्पर्धेच्या दिवशी मी सर्दी आणि तापाने पूर्णपणे फणफणत होतो. पण स्पर्धेत उतरायचेच असा निर्धार करून तिथपर्यंत पोहोचलो, तर बोटीमध्ये बसल्यावर तांत्रिक बिघाड होऊन बोट उलटली. त्यामुळे नाका-तोंडात पाणी जाऊन अजून अस्वस्थ वाटायला लागले, तरीही मी निदान शर्यतीत उतरायचे असे म्हणून उतरलो, पण शरीर साथ देत नसल्याने पदकापासून वंचित राहिलो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सांघिक स्पर्धा होती. त्यावेळीदेखील अंगात ताप आणि अशक्तपणा होता. मात्र आदल्या दिवसापेक्षा थोडा कमी होता. त्यावेळी मात्र आपण कमी पडल्याने अन्य तिघांचे पदक हुकायला नको, असा निर्धार करूनच गेलो. त्यामुळेच स्वर्ण सिंग, ओमप्रकाश आणि सुखमित सिंग यांच्याबरोबरीने कामगिरी पार पाडत सुवर्ण मिळवू शकल्याने अत्यानंद झाला.  त्यानंतर जेव्हा पदक प्रदान करण्यात आले, तेव्हादेखील मी अशक्तपणाने कोसळलो होतो. पण देशाला पदक मिळवून दिल्याचे समाधान मनात होते.

  • सांघिक प्रकारासाठी किती काळ एकत्रित सराव केला आणि त्याचा कितपत फायदा झाला?

आम्ही चौघेही सरावात प्रामुख्याने सिंगल स्कलवर भर देत आलो. निवड प्रक्रियेतही सिंगल स्कलमध्ये सर्वोत्तम वेळ नोंदवणाऱ्या आम्हा चौघांची निवड करण्यात आल्यामुळे आशियाईपूर्वी तीन महिने आम्ही एकत्रित होतो. पण केवळ सांघिक प्रकारासाठी आम्ही फार सराव केला नव्हता. पण आमची चौघांची ताकद साधारणपणे एकसारखी असल्याने सर्व हालचालींचे सिंक्रोनायजेशन अचूक होते, त्याचा अनुभव आम्ही घेतला होता. त्यामुळे स्पर्धेपूर्वी काही दिवस केलेला सराव आणि ऐन स्पर्धेत शरीरातील सर्व ताकद पणाला लावल्यानेच सुवर्णपदकाला गवसणी घालू शकलो.

  • टोकियो ऑलिम्पिक दोन वर्षांवर आले आहे, त्यादृष्टीने काय तयारी सुरू आहे?

रिओ ऑलिम्पिकमध्ये मी १३वा आलो होतो. तो माझा पहिलाच खऱ्या अर्थाने मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव होता. खरे तर तेव्हापासूनच मी पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू केली आहे. पण आशियाईत सिंगल स्कलमध्ये पदक हुकल्याने तर ती कसर ऑलिम्पिकमध्ये भरून काढायचीच असाच निर्धार केला आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये मी सिंगल स्कल प्रकारात ६ मिनिटे ५४ सेकंदांची वेळ दिली होती. त्यात दोन सेकंद कमी करून ती वेळ ६ मिनिटे ५२ सेकंदांपर्यंत आणण्यात यशस्वी झालो आहे. त्यावेळी ६ मिनिटे ४७ सेकंदांची वेळ देणाऱ्याला सुवर्णपदक मिळाले होते. त्या वेळेपासून पाच सेकंदच दूर असून स्पर्धेपर्यंत विदेशातील विशेष प्रशिक्षण सत्र आणि वेगळ्या प्रकारच्या सरावातून तेवढा वेळ भरून काढेन असा विश्वास वाटतो.

  • सैन्यदलाकडून आणि केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा आणि प्रोत्साहन याबाबत समाधानी आहेस का?

नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या चांदवड तालुक्यातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य युवकाला पाण्यासाठी केवळ कुदळ आणि पहारीने विहिरी खणणे माहिती होते. माझ्या वडिलांच्या त्या कष्टप्रद व्यवसायात योगदान देण्याने माझ्या हातांचे स्नायू इतरांपेक्षा बळकट झाले होते. पण त्याची मला कधीच जाणीव नव्हती. सैन्यात मी प्रवेश घेतल्यानंतर सैन्यदलाचे प्रशिक्षक कुदरत अली यांनी मला नौकानयनसाठी निवडले. केवळ हात आणि खांद्याच्या भक्कमपणाकडे बघून त्यांनी केलेली ही निवड माझे जीवन बदलवणारी ठरली. त्यानंतर मला नौकानयन हा खेळ काय असतो, ते प्रथम समजले. या प्रवासाबद्दल मी सैन्यदलाचा कायम ऋणी राहीन. सैन्यदलात मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधांमुळेच मी इतकी मजल मारू  शकलो, तर केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडूनही आम्हाला खूप प्रोत्साहन मिळत आहे. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीच्या वेळी त्यांनी प्रत्येक खेळाडूच्या योगदानाबद्दल खूप कौतुक करून पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व पाठबळ पुरवण्याचे आश्वासन दिले असल्याने मी त्याबाबत पूर्णपणे समाधानी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button