breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटीच्या शिवशाही बसचे वर्षभरात २३० अपघात

  • अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून अतोनात प्रयत्न; नियम पाळा, अन्यथा कारवाईचा महामंडळाचा इशारा

एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या एसटीतील भाडेतत्त्वावरील व स्वत:च्या मालकीच्या शिवशाही बसचे तब्बल २३० अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी सध्या एसटी महामंडळाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. बसवरील कार्यरत खासगी व एसटीचालकांना पुन्हा प्रशिक्षण, तसेच भाडेतत्त्वावरील शिवशाही बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचना केली असून नियम न पाळणाऱ्या कंत्राटदारांना कारवाईचा इशारा दिला आहे.

खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता एसटी महामंडळाने वर्षभरापूर्वी वातानुकूलित शिवशाही बस दाखल करण्याचा निर्णय घेतला. अशा दोन हजार बसगाडय़ा खरेदी करण्याचे नियोजन असून यामध्ये १,५०० भाडेतत्त्वावर आणि ५०० गाडय़ा एसटी महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. सध्या ९७६ वातानुकूलित बसगाडय़ा ताफ्यात असून यातील ४९४ बस गाडय़ा एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. वातानुकूलित असलेल्या या गाडय़ांची राज्यभरात सेवा सुरू आहे. मात्र त्याच्या सेवेपेक्षा या गाडय़ांच्या होणाऱ्या अपघातांचीच अधिक चर्चा आहे. गेल्या वर्षभरात शिवशाही बस गाडय़ांचे अपघात सत्र वाढलेले असून २३० अपघात झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामध्ये १९ प्राणांतिक अपघात असून १९० हे गंभीर अपघात, तर २१ किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात आले.

स्वत:च्या मालकीच्या शिवशाही बस गाडय़ांवर एसटीचेच चालक, तर खासगी बस गाडय़ांवर कंत्राटदारांकडून चालक नेमण्यात आले आहेत. वेगाने वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे इत्यादी प्रकारे अपघात झाल्याची नोंद असून त्यामुळे बसवरील सेवेत असलेल्या चालकांच्या प्रशिक्षणावरच मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महामंडळाने या बसवर कार्यरत चालकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे कामही टप्प्याटप्प्यात सुरू केले आहे. एसटीच्या चालकांचे प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. तर ऑगस्टपासून भाडेतत्त्वावरील शिवशाही बसवर कार्यरत चालकांचे प्रशिक्षण सुरू होईल.

कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा

भाडेतत्त्वावर शिवशाही बस गाडय़ा चालविणारे सात कंत्राटदार आहेत. लांब पल्ल्याच्या एका फेरीनंतर पुन्हा परतीच्या मार्गावर नवीन चालक देण्याची सूचना एसटी महामंडळानेच कंत्राटदारांना केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी काही जणांकडून केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे असे कंत्राटदार व चालकांवर कारवाईचा इशारा महामंडळाने दिला आहे.

वर्षभरात शिवशाही बस गाडय़ांचे अपघात जास्तच झाले आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र एसटीच्या होणाऱ्या एकूण अपघातांच्या तुलनेत ते कमी आहेत. शिवशाही बसचे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच परतीच्या प्रवासात नवीन चालक न देणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईदेखील केली जाणार आहे.   – रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button