breaking-newsराष्ट्रिय

एनडीए सरकार योग्य मार्गावर – पंतप्रधान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी

कटक – केंद्रातील “एनडीए’ सरकार हे भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्याशी कटिबद्ध असून सरकारच्या धोरणामुळे कित्येक भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सरकार योग्य मार्गावरून मार्गक्रमण करत असून जनतेने या सरकारवरच्या विश्‍वासावर शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेमध्ये सरकारच्या यशाचा आलेख मांडला. देशातील 20 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. यातूनच जनतेचा “एनडीए’च्या गेल्या चार वर्षांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास असल्याचे सिद्ध होते, असेही पंतप्रधान म्हणाले.

देशभरात काळ्यापैशाविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली. तब्बल 3 हजार ठिकाणी विविध तपास संस्थांच्यावतीने छापे घालण्यात आले. तर तब्बल 73 हजार कोटींचा काळापैसा बाहेर काढण्यात आला. काळ्यापैशाविरोधात केलेल्या कठोर नियमांमुळे अनेकांना एकाच पातळीवर आणून ठेवले गेले. त्यामुळे या सर्वांचे धाबे दणाणले आहे. अशा शब्दात मोदींनी “एनडीए’वर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका केली.

देशात परिवर्तन घडू शकते, यावर “एनडीए’च्या चार वर्षांच्या राजवटीमध्ये जनतेचा विश्‍वास बसला आहे. देशाचा प्रवास कुशासनाकडून सुशासनाच्या दिशेने आणि “कालाधन’कडून “जनधन’च्या दिशेने होतो आहे. “सब का साथ, सब का विकास’ या ध्येयाने “एनडीए’ सरकार काम करत आहे, हे जनता बघते आहे.

देशाच्या कल्याणासाठी कठोर निर्णय घ्यायला “एनडीए’ सरकारने मागेपुढे बघितलेले नाही. या सरकारमध्ये कोणताही संभ्रम नाही. या सरकारमध्ये बांधिलकी आहे, कटिबद्धता आहे. या सरकारमध्येच “सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची ही क्षमता आहे, असे मोदी म्हणाले. उलटपक्षी कॉंग्रेसने केवळ सत्तेचीच चिंता केली असल्याची टीकाही मोदींनी केली.

सरकारच्या कार्यवाहीचे मूल्यमापन जनतेकडून 
“एनडीए’ सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या “नमो’ ऍपवर एक ऑनलाईन सर्व्हेची घोषणा केली. भाजपशासित केंद्र सरकार, आपापल्या परिसरातील खासदार आणि आमदारांच्या कामकाजाबाबतचे मूल्यमापन नोंदवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे. नागरिकांनी भाजपच्या आपल्या राज्यातील सर्वात लोकप्रिय तीन नेत्यांची नावे आणि त्यांचे मतदारसंघही नोंदवावीत. त्यांची उपलब्धता, प्रामाणिकपणा, नम्रता आणि लोकप्रियतेच्या आधारे त्यांचेही मूल्यांकन करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button