breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ खडसेंनी भाजपाला दिला २ ओळींचा राजीनामा; राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंना काय मिळणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात सर्वप्रथम एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस करून विधान परिषदेत पाठवलं जाईल. त्यानंतर एकनाथ खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंना कृषीमंत्रीपद दिलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे. यात कृषी खातं सध्या शिवसेनेकडून असून दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आहे.

एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवायचं असेल तर महाविकास आघाडीत खातेबदल करावी लागेल. यात मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने कृषी खाते घेतल्यास त्याबदल्यात शिवसेनेला गृहनिर्माण खाते सोडावं लागणार आहे. सध्या गृहनिर्माण खात्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित आहे.

२ ओळींचा राजीनामा

अलीकडच्या काळात डावललं जात असल्याने एकनाथ खडसेंना भाजपाला सोडचिठ्ठी घेण्याचा निर्णय घेतला, गेली ४० वर्ष भाजपाच्या वाटचालीत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं योगदान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर एकनाथ खडसेंनी उघडपणे भाष्य करत नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना एकनाथ खडसेंनी अवघ्या २ ओळी लिहिल्या आहेत, त्यात म्हटलंय की, मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आलं आहे.

खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू

गेली ४० वर्षे मी भाजपाला वाढवण्याचं काम केलं. पक्ष घराघरात नेण्यासाठी कष्ट घेतले. पक्षानं मला अनेक पदं दिली हे मी कधीही नाकारणार नाही. पण मी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझी पक्षावर नाराजी नाही. केवळ एका व्यक्तीवर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री असावा असं मत मी व्यक्त केलं होतं. त्यानंतर माझ्यासोबत जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं असं सांगत एकनाथ खडसेंना भावना अनावर झाल्या.

मी पक्षासाठी कष्ट घेतले. त्यामुळे मला पदं मिळाली. जे मिळवलं ते स्वत:च्या ताकदीवर आणि मेहनतीवर मिळवलं. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या कित्येक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. आयारामांना पदं दिली गेली. आम्हाला पदाचा मोह कधीच नव्हता. त्यामुळेच पक्ष विरोधात असतानाही आम्ही पक्षाची साथ सोडली नाही. कोणाच्या उपकारांवर आम्ही जगलो नाही. सध्या पक्षात मिरवत असलेल्या नेत्यांचं पक्षासाठीच योगदान काय?, असा थेट सवाल खडसेंनी उपस्थित केला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button