breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘उमेदवार देता येत नाही, असा शहराध्यक्ष’, ‘फॉर्म भरता येत नाही, असा कार्याध्यक्ष’, अन् म्हणे ‘राष्ट्रवादी पुन्हा…’

  • कुचकामी नेतृत्वामुळे राष्ट्रवादी संपुष्टात?
  • धोरणकर्त्यांकडून पक्ष होतोय विसर्जीत

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात कधी नव्हे इतकी दुर्दशा राष्ट्रवादीची झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असताना चिंचवड आणि भोसरी मतदार संघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नसणे, हे शहराध्यक्षाचे अपयश मानले जात आहे. तर, चिंचवड मतदार संघाची उमेदवारीच बाद ठरणे, म्हणजे उमेदवारातील निरक्षरपणाचे लक्षण आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींवरून ‘उमेदवार देता येत नाही, असा शहराध्यक्ष’, ‘फॉर्म भरता येत नाही, असा कार्याध्यक्ष’ अन् म्हणे ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ अशा शैलीत पक्षाची खिल्ली उडवली जात आहे.

पिंपरी-चिंचवडची भौगोलीक आणि ऐतिहासिक रचना करण्यात योगदान देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी या विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसते. कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने पक्षाची वाताहत होताना दिसत आहे. एकेकाळी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेले. दरम्यान, पाच वर्षात राष्ट्रवादीचे माजी आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि पक्षाची मोठमोठी पदे भोगणा-यांनी पक्षाला तारले नाही. त्यामुळे आज पक्षाची एवढी पडझड होताना दिसत आहे. पिंपरी सोडले तर चिंचवड आणि भोसरी या दोन मतदार संघात राष्ट्रवादीला हक्काचा उमेदवार देता आला नाही. हे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे अपयश आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पिंपरीतून ‘सुलक्षणा धर की आण्णा बनसोडे’ या वादात नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटी आण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली. भोसरीतून ‘दत्ता साने की विलास लांडे’ या वादात दोघांनीही राष्ट्रवादी पुरस्कृत अर्ज दाखल केले. तर, चिंचवडमधून प्रशांत शितोळेंना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा अर्ज छानणीत बाद ठरल्याने आता राष्ट्रवादीचा पत्ता कट झाला आहे. एबी फॉर्म अर्जासोबत जोडला नसल्यामुळे उमेदवारी अर्ज बाद ठरला असल्याचे स्वतः प्रशांत शितोळे यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांच्याही साक्षरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज शहरातील दोन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नाही. यावरून शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

...आत्मचिंतन करण्याची वेळ

मुळात 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. 36 नगरसेवक निवडून आल्याने विरोधी बाकावर राष्ट्रवादीला स्थान मिळाले. अडीच वर्षात शहरामध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्नाला वाव असताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सत्ताधा-यांच्या विरोधात आंदोलन करायचे झाले तर नगरसेवकांना बोलावून आणावे लागते. दादांनी शहरातील अनेकांना जाती-पातीच्या पलिकडे जाऊन मोठ-मोठी पदे दिली. महापौर, स्थायी सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता अशी महत्वाची पदे दिली. मात्र, त्याचा पक्षाला कितपत फायदा झाला हे आज कळून चुकले आहे. लोकसभा निवडणुकीत तर पार्थ पवार यांचा शहरातूनच पराभव झाला. यामुळेच दादांनी या शहराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पक्षाची पडझड रोखायची असेल तर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज जमा केल्यानंतर त्यांचा एबी फॉर्म जमा केला जाणार होता. एबी फॉर्म घेऊन जाणारा व्यक्ती उशिरा पोहोचला. तो जमा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द झाला. भोसरीच्या जागेबाबतचा निर्णय अगोदरच जाहीर केला होता. पक्षाच्या बाबतीत मी शहर पातळीवर निर्णय घेणारा पदाधिकारी आहे. शेवटी पक्षाची काही तरी स्ट्रॅटेजी असते. त्यानुसार काम करावे लागते. ऐनवेळी मूळ भूमिका समोर येईल.

संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी-चिंचवड शहर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button