breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमहापौर केशव घोळवे आणि पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील भेटीने आमदारांचा ‘बीपी’ हाय

  • जुन्या गटाआडून मुंडेचा महापालिकेत वाढणार हस्तक्षेप
  • दोन्ही आमदारांच्या वर्चस्वाला मिळाले थेट आव्हान

पिंपरी / अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवडचे उपमहापौरपद पदरात पडताच केशव घोळवे यांनी भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी थेट मुंबई गाठली. उपमहापौर पद मिळवून देण्यात मुंडेचा मोठा वाटा असल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. घोळवेंच्या या भेटीने पिंपरी-चिंचवड भाजपातील राजकीय घोळ आणखी वाढला आहे. यापुढे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात पंकजा मुंडेचा हस्तक्षेप वाढणार असल्याने भाऊ आणि दादांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी दिली आहे. पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपल्या निवडीनंतर घोळवे यांनी मुंबईत जाऊन भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडेंची भेट घेतली. पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, केशव यांचे अभिनंदन करताना, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा उपमहापौर झाला, याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुढील कार्यासाठी घोळवे यांना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

घोळवे हे भाजपच्या जुन्या फळीचे फलंदाज मानले जातात. मात्र, महापालिकेवर शहर भाजपाध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले आहे. दोन्ही गटांमधील प्रत्येकाला महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याचा दोन्ही गटांमध्ये अलिखीत करार झालेला आहे. त्यानुसार उपमहापौर पदासाठी लांडगे गटाचे वसंत बोराटे तिव्र इच्छुक होते. तर, जगताप गटाचे संदीप कस्पटे यांना संधी देण्याचे ठरले होते. ऐनवेळी भाजपच्या जुन्या गटाने मुसंडी मारून प्रदेश पातळीवरील भाजप नेत्या पंकजा मुंडेचा हस्तक्षेप आणल्याने दोन्ही गटांतील इच्छुकांच्या आपेक्षांना मुरड बसली. शेवटी जुन्या गटाचे फलंदाज घोळवे यांना उपमहापौर पदावर संधी देऊन भाऊ आणि दादांना गटांतर्गत नाराजी ओढवून घ्यावी लागली. यावर सत्य शांतपणे स्वीकारणे हे यशाचे गमकअसल्याचे सांगत दादांना आपला नाईलाज झाल्याचा संदेश कार्यकर्त्यांना द्यावा लागला.


सरतेशेवटी भाऊ-दादांवर आणखी वाढणार दबाव

पिंपरी पालिकेतील भाजप सत्तेच्या शेवटच्या वर्षात जुन्या गटाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. उपमहापौर पदावर घोळवे यांची निवड झाली असली तरी आता महापौर पदाचा देखील राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. स्थायी समितीवर देखील पुढील वर्षात जुन्या गटाला संधी देण्यासाठी प्रदेश नेतृत्वाकडे स्थानिक नेत्यांकडून शिफारशी होत असल्याचे बोलले जात आहे. सरतेशेवटी जुन्या गटाला प्रधान्य देण्यासाठी दोन्ही आमदारांवर दबाव वाढला तर त्यांच्या समर्थकांना भाऊ-दादांनी जो शब्द दिलेला आहे, त्याचे काय होणार ? हा चिंता वाढविणारा प्रश्न आहे. शेवटच्या वर्षात भ्रमनिरास झाला तर दोन्ही गटातील नाराज नगरसेवक फुटीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात फुटीरवाद्यांना रोखून आपले राजकीय वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपात राहून दोन्ही आमदार कोणती खेळी खेळणार हे पाहणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button