breaking-newsक्रिडा

उत्तम नियोजन हेच यशाचे गमक- जसप्रीत बुमराह

  • लोकेश राहुलला बाद करण्यासाठी लावलेल्या सापळ्याला यश 

मुंबई – आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे वेगळा ठरलेला, तरीही अचूक माऱ्यामुळे अल्पावधीतच यश मिळविणारा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पंजाबची घोडदौड रोखताना मुंबई इंडियन्स संघाला केवळ 3 धावांनी आश्‍चर्यकारक विजय मिळवून दिला. या विजयामुळे मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेत प्ले-ऑफ फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले.

जसप्रीत बुमराहने अत्यंत मोक्‍याच्या क्षणी तीन खंदे फलंदाज तंबूत परतवून मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याने कर्णधार रोहित शर्माकडून शाबासकीही मिळविली. परंतु आपल्याला हे यश उत्तम नियोजन आणि नियोजनाशी इमान राखून खेळ केल्यामुळेच मिळाल्याचे बुमराहने सांगितले. पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्या झंझावाती भागीदारीमुळे मुंबईने 186 धावांची मजल मारल्यानंतर प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल केवळ 18 धावा करून परतला होता. परंतु लोकेश राहुलने ऍरॉन फिंचच्या साथीत 12.2 षटकांत 111 धावांची भागीदारी करीत पंजाबला विजयाकडे नेले होते.

पंजाबचा विजय स्पष्ट दिसत असताना बुमराहने एकाच षटकांत फिंच आणिँ मार्कस स्टॉइनिस यांना बाद करीत मुंबईला रिंगणात आणले. इतकेच नव्हे तर 60 चेंडूंत 94 धावांची खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला 19व्या षटकांत बाद करून त्याने पंजाबची आगेकूच रोखली. अखेरच्या षटकांत 17 धावांचे आव्हान पंजाबला पेलवले नाही आणि मुंबईने 3 धावांनी विजय मिळविला. केवळ 15 धावांत 3 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामन्याचा मानकरी ठरला.

राहुलला बाद करणे हेच लक्ष्य 
लोकेश राहुल यंदाच्या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तो चांगलाच खेळणार असे आम्ही गृहीत धरले होते. आम्ही या सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाजी करणार होतो. त्यामुळे मी गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंड आणि मेन्टॉर लसिथ मलिंगा यांच्याशी चर्चा केली, असे सांगून बुमंराह म्हणाला की, मैदानावर दंव असणार हेही आम्ही ध्यानात घेतले. राहुल आणि फिंच हे दोघे जोरदार आगेकूच करीत होते, तेव्हाही मी बाकी कशाचाही विचार न करता केवळ मला काय करायचे आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करीत होतो. राहुलची फटक्‍यांची निवड अचूक असते. परंतु त्याला फटका लगावण्यासाठी चुकीच्या चेंडूची निवड करायला लावणे हेच माझे लक्ष्य होते. अखेर 19व्या षटकांत मला संधी मिळाली. राहुल परतल्यावर आमचे काम सोपे बनले.

वैयक्‍तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा 
पंजाबच्या अँड्रयू टायनेही केवळ 16 धावांत 4 बळी घेत पर्पल कॅपचा मान मिळविला. टायने यंदाच्या मोसमात सर्वाधिक 24 बळी घेतले आहेत. परंतु संघ पराभूत होत असताना या सगळ्या वैयक्‍तिक कामगिरीला महत्त्व नसल्याचे टायने नमूद केले. मुंबईविरुद्ध विजयाच्या इतक्‍या जवळ येऊनही आमचा पराभव झाला हे निराशाजनक होते, असे सांगून टाय म्हणाला की, फलंदाजी आणि गोलंदाजीतही काही मोजकेच खेळाडू चमक दाखवीत असल्यामुळे आमच्या संघाच्या कामगिरीवर मर्यादा आल्या. किंबहुना लोकेशराहुलने एकट्यानेच फलंदाजीचा भार वाहिला. तसेच ोगलंदाजीत मी आणि मुजीब यांनी चमक दाखविली. बाकी खेळाडूंनी हातभार लावला असता, तर चित्र निश्‍चितच वेगळे दिसले असते. ख्रिस गेलसारख्या खेळाडूचे अपयश संघासाठी निश्‍चितपणे तोट्याचे ठरले. तसेच करुण नायरसारख्या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्याने सपशेल निराशाच केली. एकंदरीत आमची कामगिरी सांघिक नव्हती आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button