breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उजनी धरणाची सत्तरीकडे वाटचाल ; जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस

सोलापूर – जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही वर्षात राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी सोलापूरची ओळख झाली आहे. वीर, भाटघर आणि उजनी जलाशयामुळे वाढलेल्या ऊसाच्या क्षेत्राचा हा परिणाम आहे. एखाद्या वर्षीचा अपवाद वगळता निरा खोऱ्यातील देवधर, वीर, भाटघर ही धरणे दरवर्षी भरतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्याचा सिंचनाचा प्रश्‍न सुकर व्हायला मोठी मदत होते.

भिमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर सोडले जाणारे पाणी थेट उजनीत जमा होते त्यामुळे अनेकवेळा जिल्ह्यात चांगला पाऊस पडला नसला तरी उजनीची पातळी सुधारते. यंदा ही त्याचा प्रत्यय आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी सुधारली असून त्या परिसरात पाऊस सुरू असल्याने उजनीची पाणी पातळी सुधारली आहे. त्यामुळेच उजनी कालवा व सिना माढा योजनेच्या माध्यमातून पाणी सोडणे सुकर झालेले आहे. उजनी वरील धरणांची सुधारलेली स्थिती, पुणे परिसरात पडणारा पाऊस आणि उजनीत येणारा विसर्ग पाहता, येत्या काही दिवसात उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे शेतकरी व साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.

निरा खोऱ्यातील देवधर, भाटघर, वीर ही धरणे भरली आहेत. तर आज (दि.21) सकाळी गुंजवणी धरणात 87.77 टक्के पाणीसाठा होता. त्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा विचार करून दपारी 1 वाजता धरणाच्या सांडव्यातून दोन हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी 4 वाजता गुंजवणी शंभर टक्के भरले आहे त्यामुळे निरा खोऱ्यातील चार ही धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी आता नदी व कालव्यात सोडले जात आहे. तेथे पडणारा पाऊस लक्षात घेऊन वीर मधून नदीत सोडला जाणारा विसर्ग कमी जास्त केला जात आहे. सायंकाळी 6.00 वाजता वीर धरणामधून निरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग. गुंजवणी, नीरा देवघर व भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा विचार करून 23185 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर वीरमधून सोडला जाणार विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button