breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘ईव्हीएम’बाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी ‘बॅलेट’ पेपरवर मतदान घ्या – अजित पवार

  • पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केली मागणी
  • प्रगत देशातील ‘बॅलेट’ पेपर मतदान प्रक्रियेचे दिले उदाहरण

पिंपरी, (महाईन्यूज) – ईव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे. कारण, लोकसभेला एकतर्फी निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात निवडणूक विभागाच्या कामकाजाबाबत संभ्रम वाढला आहे. जगातील प्रगत देशामध्ये सुध्दा बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. ईव्हीएम मशिनबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या सर्वच पदाधिका-यांची आढावा बैठक घेतली. तत्पुर्वी, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या विरोधातील आपली भूमिका मांडली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, पंकज भालेकर आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, भाजप सकारविषयी लोकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. लोकांना फसवण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे या सरकारला घरी पाठविण्यासाठी समविचारी पक्षाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेला विश्वास देऊन आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा आमचा मानस आहे. जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही लोकांना विश्वासात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील.

आमदारांना चौकशीची भिती दाखविले जाते

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत असते. काही व्यक्तींना सत्तेत रहायचे असते. काहींना राजकीय भवितव्य घडविण्याची चिंता लागलेली असते. यावेळी आपल्याला पद नाही मिळाले तर यापुढे कधीच मिळणार नाही, असा काहींचा अंदाज असतो. त्यामुळे काही लोकं पक्षांतर करत असतात. तर, काही लोकं पक्षासोबत निष्ठा जपून काम करतात. निवडणुकीपुर्वी सक्षम पर्याय नसेल तर विरोधी पक्षातल्या पदाधिका-याला प्रलोभने दाखविली जातात. चौकशी करण्याची भिती दाखविली जाते. त्यामुळे आमदार, खासदारांना फोडण्याचा उद्योग केला जातो. त्याचा पक्षावर काहीही फरक पडत नाही, असेही अजित पवार यावेळी सांगितले.

पार्थ कदापी खचणार नाही

मावळ लोकसभा मतदार संघातून पराभव झाल्यानंतर पार्थ पवार यांचे खच्चीकरण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून पार्थ खचलेला नाही. पक्षाचे अन्य उमेदवारही पराभूत झाले आहेत. पक्षासाठी केवळ पार्थच महत्वाचा नसून सर्व उमेदवार महत्वाचे आहेत. त्यामुळे पराभूत उमेदवारांचे मनोधैर्य खचणार नाही, याची काळजी आम्ही घेतोच. शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळा निर्णय असतो. आम्ही कोणावर जोरजबरदस्ती करत नाही, असे पवार म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button