इंदुरीकर महाराजांना आरोग्य विभागाची नोटीस
गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने नोटीस दिली आहे. मात्र त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. वादग्रस्त वक्तव्याचे पुन्हा जाहीर समर्थन सुरू केल्याने त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सोमवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. गर्भलिंग चाचणीसंदर्भात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी त्यांना प्रसूतिपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सल्लागार समितीनेही नोटीस बजावली आहे. अद्याप इंदुरीकर यांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही. इंदुरीकर महाराज यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी पुणे येथील सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे.