breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आळंदी: भाविकांची आर्थिक पिळवणूक; देवस्थान कमिटीवर कारवाईचे आदेश

पुणे  –  आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर मंदिराचे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी’च्या व्यवस्थापनावर पुणे सह धर्मादाय आयुक्‍त दिलीप देशमुख यांनी ‘कलम 41 डी’ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. देवस्थानच्या चोपदारांची अरेरावी, भाविकांची होणारी आर्थिक पिळवणूक, पुजार्‍यांकडून भाविकांची होणारी लूट, देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण यासह अन्य तक्रारीमुळे विश्‍वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

आळंदी देवस्थानच्या चोपदारांची अरेरावी, भाविकांची होणारी आर्थिक पिळवणूक, पुजार्‍यांकडून भाविकांची होणारी लूट, देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण आणि एकूणच व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यास विश्‍वस्तांना आलेले अपयश यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. येथील तक्रारी आल्यानंतर धर्मादाय निरीक्षक कैलास महाले यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये जे आढळले त्याचा त्यांनी 50 पानांचा अहवाल सहायक धर्मादाय आयुक्‍त राहुल चव्हाण यांना सादर केला. त्यानंतर सह धर्मादाय आयुक्‍त दिलीप देशमुख यांनी बुधवारी हे आदेश दिले. आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर माउलींचे देवस्थान जगप्रसिध्द आहे. आषाढी आणि कार्तिक वारीला तर येथे भाविकांची मांदियाळी जमते. त्यामुळे देवस्थानवर कारवाई करण्यात येणार असल्याने खळबळ उडाली आहे.

भाविकांना चप्पल स्टँड, पिण्याचे पाणी यांसह आदी सुविधा मोफत पुरविणे हे प्रत्येक देवस्थानचे कर्तव्य आहे. पण, मंदिराच्या बाहेरील चप्पल स्टँडवर पैसे आकारण्यात येत असून त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. तसेच त्या कंत्राटदाराची मुदत संपली असून त्याचे नूतनीकरणही झालेले नाही, असे निरीक्षकांच्या अहवालात आढळून आले आहे.

येथील चुकीच्या गोष्टीबाबत बर्‍याच वषार्र्ंपासून धर्मादाय कार्यालयाकडे तक्रारी येत होत्या. त्यापैकी येथील चोपदारांची वाढलेली अरेरावी ही प्रमुख तक्रार होती. येथील चोपदार हे त्यांचा अधिकार नसलेल्या गोष्टीत हस्तक्षेप करणे, भाविकांकडून पैसे घेणे या तक्रारी होत्या. तसेच त्यांनी गेल्या वर्षी ‘चोपदार फाउंडेशन’ हे न्यास धर्मादाय कार्यालयात नोंद केले आहे. त्याच्याही कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय कार्यालयाने दिले आहेत.

नियमानुसार येथे ज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी स्थळात पूजा करण्यासाठी 320 रुपये फी देवस्थानकडे भरणे आवश्यक आहे. पण येथील पुजारीच भाविकांकडून परस्पर पैसे घेऊन देवस्थानास केवळ 20 रुपये देत आणि स्वतःकडे 300 रुपये ठेवत असत. या सर्व बाबींकडे विश्‍वस्तांचे कोणतेही लक्ष नसल्याचे आढळून आले.

देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण

देवस्थानची घटना 1852 सालची असून ती तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तयार केलेली आहे. त्यामध्ये देवस्थानच्या मालकीची 435 एकर जमीन असून त्यावर शाळा व इतर अतिक्रमण झालेले आहे. तसेच घाटावरील दुकाने यांचे करारनामे संपलेले आहेत. त्यांनी पोटभाडेकरूही ठेवले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. येथील देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला  नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button