breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आरामदायी प्रवासाची प्रतीक्षाच!

मध्य रेल्वेवर आठ बम्बार्डियर लोकल जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता

मुंबई : आरामदायी आणि हवेशीर अशा बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वेला अद्यापही प्रतीक्षाच आहे. ‘एमयूटीपी-२’अंतर्गत आठ लोकल टप्प्याटप्याने दाखल होण्यास जून २०१९ उजाडणार आहे. या लोकल गाडय़ांच्या महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘एमयूटीपी-२’ अंतर्गत पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ पर्यंत प्रशस्त आणि हवेशीर अशा ७२ बम्बार्डियर लोकल गाडय़ा दाखल झाल्या. त्यातील ४० लोकल मध्य रेल्वेला आणि ३२ लोकल पश्चिम रेल्वेवर येणार होत्या. मात्र तांत्रिक कारणास्तव या लोकल मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या. त्याबदल्यात पश्चिम रेल्वेवरील काही सिमेन्स लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या. या लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यानंतर मध्य रेल्वेनेही त्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३४ बम्बार्डियर लोकल दाखल होणार होत्या. परंतु आतापर्यंत २६ लोकल दाखल झाल्या असून आणखी आठ बम्बार्डियर लोकलची मध्य रेल्वेला प्रतीक्षा आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा ‘एमयूटीपी-२’चा भाग आहे. पश्चिम रेल्वेवर सर्व बम्बार्डियर लोकल दाखल झाल्यानंतर मध्य रेल्वेलाही याच प्रकल्पांर्तगत नवीन लोकल मिळत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी चार याप्रमाणे लोकल दाखल होणार होत्या. परंतु त्या दाखल होण्यास जून महिना उजाडेल, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवर धावत असलेल्या बम्बार्डियर लोकलपैकी १२ गाडय़ांमधील महिला डब्यात आणि १० सीमेन्स लोकलच्या महिला डब्यातही सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. जून महिन्यापर्यंत येणाऱ्या आठ बम्बार्डियर लोकलमधील महिला डब्यातही सीसीटिव्ही कॅमेरे असतील.

टप्प्याटप्प्याने सेवेत येणार

सध्या याच शेवटच्या विनावातानुकूलित लोकल मुंबईत येणे बाकी आहेत. यापुढे येणाऱ्या सर्व लोकल गाडय़ा वातानुकूलितच असणार आहेत. ‘एमयूटीपी-३’ अंर्तगत ४७ आणि ‘एमयूटीपी-३ ए’ अंर्तगत २१० वातानुकूलित लोकल पाच वर्षांत दाखल होतील. आता पश्चिम रेल्वेवर एक वातानुकूलित लोकल धावत असून दुसरीही लोकल मुंबईत दाखल झाली आहे. तसेच ‘एमयूटीपी’ प्रकल्पाव्यतिरिक्त आणखी दहा वातानुकूलित लोकलही टप्प्याटप्यात दाखल होतील.

तांत्रिक अडचणी

* डिसेंबर २०१७ पर्यंत पश्चिम रेल्वेवर ७२ लोकल गाडय़ा दाखल झाल्यानंतर त्यानंतर वर्षभरात ३४ बम्बार्डियर लोकल रेल्वेच्या चैन्नईतील कारखान्यातून टप्प्याटप्याने दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आलेल्या वातानुकूलित लोकल आणि काही तांत्रिक अडचणी यामुळे त्याला विलंब झाल्याचे सांगण्यात येते.

* सध्या मध्य रेल्वेवर १७२ लोकल गाडय़ा आहेत. त्यामध्ये ११३ सिमेन्स कंपनीच्या लोकल, २६ बम्बार्डियर कंपनीच्या, १४

* अल्टरनेट करंटवर धावणाऱ्या, १६ डायरेक्ट करंट अल्टरनेट करंटवर धावणाऱ्या व तीन मेमू गाडय़ा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button