breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा वर्षावर बोलावून घ्या – अजित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टिका

पुणे – ‘लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी काही तरी बोलायचे, अशी सवयच भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लागली आहे. त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्यावे. तेथे सीसीटीव्ही तसेच इतर सुविधाही असतात. तेथे बसून चर्चा करावी. परंतु, त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवावे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरूजन पुरस्कारांच्या वितरणानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना पाटील यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चांचाही पवार यांनी समाचार घेतला. ‘सरकार चालविणाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन कामे करायची असतात. कामे झाली नाही, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असते. मात्र, शिवसेनेचा तो वकूब नाही. सत्ताधारी मोर्चा काढत नाहीत. शिवसेनेला प्रश्न सोडवता येत नसल्याने मोर्चा काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून आपण शेतकऱ्यांसाठी काही तरी करतोय, असे दाखविण्यात येत आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. ‘विधानसभेत ज्या पक्षाकडे १४५ आमदार आहेत त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला असेल तरी आमदारांची संख्याच शेवटी महत्त्वाची असते,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाबाबत पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, ‘प्रत्येक पक्ष्याच्या कार्यकर्त्याला आपआपली जागा मागण्याचा अधिकार असून, त्यादृष्टीने चर्चा होत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरच होणार आहे,’ असेही ते म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button