breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आता “पिंपरी-चिंचवड दर्शन’!

पिंपरी – पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर पिंपरी महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.ने (पीएमपीएमएल) तसे नियोजन केले असून त्यासाठी दहा वातानुकूलित बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला “हिरवा कंदील’ दर्शवण्यात आला.

स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, पुणे महापालिकेच्या वतीने पुणे दर्शन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मध्यमातून पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध उद्यानांचा फेरफटका नागरिक, पर्यटकांना मारतो येतो. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यातून औद्योगिकनगरीतील विविध प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच आयटी क्षेत्राचा प्रवास पर्यटकांना करता येणार आहे. ही बस सेवा सुरू करण्याचे पीएमपीएलचे नियोजन आहे. त्यासाठी 900 एमएम फ्लोअरच्या नामांकित कंपनीच्या, ऑटोमेटीक ट्रान्समिशनच्या बीआरटीएस वातानुकूलित अशा एकूण दहा बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत आयत्यावेळी हा विषय मंजूर करण्यात आला आहे.

दीड कोटींची रोपे खरेदी
वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यासाठी ठेकेदारामार्फत मोठी रोपे पुरवून आणि त्याची लागवड करून एक वर्षे देखभाल करण्यात येणार आहे. याशिवाय दोन मीटर उंचीची रोपेही खरेदी करण्यात येणार आहेत. या साठी 1 कोटी 63 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिकेच्या वतीने यंदा पावसाळ्यात साठ हजार वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिका वृक्षसंवर्धन विभागामार्फत वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरवून आणि त्याची लागवड करून एक वर्षे देखभाल करण्यात येणार आहे. याशिवाय दोन मीटर उंचीची वृक्षारोपणाची रोपे खरेदी करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिका उद्यान विभागामार्फत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

मोठ्या रोपांसाठी 1 कोटी 36 लाख 90 हजार रूपये दर अपेक्षित धरण्यात आला. तर 2 मीटर उंचीच्या रोपांसाठी 32 लाख 50 हजार रूपये दर अपेक्षित धरण्यात आला. या दोन्ही कामांसाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. दोन्ही कामांकरिता न्यु गार्डन गुरूज फार्म ऍण्ड नर्सरी यांनी इतर दोन ठेकेदारांपेक्षा लघुत्तम दर सादर केला. त्यामध्ये मोठी रोपे पुरविणे आणि देखभाल करण्यासाठी त्यांनी निविदा दरापेक्षा 3.50 टक्के कमी दर तर 2 मीटर उंचीच्या रोपांसाठी 3.30 टक्के कमी दर सादर केला. न्यु गार्डन गुरूज फार्म ऍण्ड नर्सरी यांची निविदा अर्थसंकल्पीय रकमेपेक्षा कमी दराची असल्याने प्रशासकीय आणि आर्थिक खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर आयत्यावेळी ठेवण्यात आला. या दोन्ही कामांसाठी मिळून 1 कोटी 63 लाख रूपये खर्चास सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बस सेवा
पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी वाहतूकीसाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. चोविसावाडी शाळा क्रमांक वीस आणि यशवंतनगर शाळा यातील अंतर तीन किलोमीटर आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रेम टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे प्रति विद्यार्थी साडेअकरा रुपये दराने सन 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये साडे तीनशे विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येणार असून त्यासाठी बारा लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button