breaking-newsमहाराष्ट्र

…आणि निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्याने सुजय विखे पाटील यांना केले ‘खासदार’

लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रातील मतदानाचे सगळे टप्पे संपले असून आता २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण कोणाला धोबीपछाड देणार कोण हरणार कोण जिंकणार हे २० दिवसांनी स्पष्ट होईलच मात्र त्याआधीच भाजपचे नगरमधील उमेदवार सुजय विखे पाटील हे खासदार झाले आहेत. हो खरचं सांगतोय आम्ही, एका लग्नपत्रिकेमध्ये सुजय विखे पाटील यांना उल्लेख खासदार असा करण्यात आला आहे. याच निवडणूकपूर्व खासदारकीमुळे ही लग्नपत्रिका सध्या नगरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

अहमदनगरमधून सुजय विखे पाटीलच खासदार होणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशाच एका कार्यकर्त्याने आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सुजय विखेंचे नाव प्रमुख उपस्थित पाहुण्याच्या यादीत छापले आहे. विशेष म्हणजे या नावाखाली सुजय विखे हे खासदार असल्याचा उल्लेख या पत्रिकेतमध्ये आहे. निवडणुकीच्या निकालाला २० दिवस बाकी असतानाच कार्यकर्त्यांच्या या अतीउत्साहामुळे निकाल लागण्याआधीच सुजय विखे पाटील खासदार झाल्याची नगरमध्ये चर्चा आहे. ही पत्रिका छापणारे मुलीचे वडील छबुराव येळवंडे यांनी ‘सुजयदादाच खासदार होणार असल्यानं आपण अशाप्रकारे त्यांच नाव छापलं आहे’, अशी माहिती दिली.

 

चर्चेत असणारी लग्नाची पत्रिका

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक गाजलेल्या मतदारसंघांमध्ये पुणे, दक्षिण मुंबई, बारामती, माढा आणि अहमदनगर या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यातही अहमदनगरमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर आव्हान उभं केलं. त्यामुळेच या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकण्यासाठी तर राष्ट्रवादीने आपला गड कायम राखण्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपाने अहमदनगरमध्ये निवडणूक प्रचारात संपूर्ण जोर लावल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि इतर दिग्गज नेत्यांनीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नगरमध्ये सभा घेतल्या. या मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button