breaking-newsमहाराष्ट्र

आठवड्यानंतरही दूधदर “जैसे थे’

शेतकऱ्यांची 15 ते 20 रुपयांवरच होतेय बोळवण 
दूध संघांकडून राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली 
उस्मानाबाद: सरकारने दूधासाठी 25 रुपये प्रतीलिटरची दरवाढी देण्याच्या घोषणेला आठवडा उलटला आहे. तरीही शेतकऱ्यांची 15 ते 20 रुपयांवरच बोळवण करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकारामुळे दूध संघांकडून राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूधदरवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध संघांना 25 रुपये प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले. पण राज्य सरकारने आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही, असा दावा दूध संघानी केला आहे.
सरकारने दूध संघांना दिलेल्या आदेशाला एक आठवडा पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर या निर्णयाची कितपत अंमलबजावणी झाली याची एका वृत्त वाहिनीने पडताळणी केली. यामध्ये दूध संघ शेतकऱ्यांकडून आजही कमी दरातच दूध खरेदी करत असल्याचे समोर आले आहे.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाआधी गायीच्या दुधाला 22 रुपये प्रतिलिटर असा भाव मिळत होता. आंदोलनानंतर अजून एकाही शेतकऱ्याला 25 रुपये दुधाचा दर मिळालेलाच नाही. उलट आज दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत.
सध्या दूध संघ शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपयांच्या भावाने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे राजू शेट्टींचे आंदोलन आणि राज्य सरकारच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, दूधदरात वाढ करण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टींनी राज्यभर मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या निषेध केला. तसेच मुंबई, पुण्यासारख्या शहरांना होणारा दूधपुरवठा रोखण्याचाही प्रयत्न झाला. आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर दूध संघांना 25 रुपये प्रतीलिटर या भावाने दूधखरेदी करण्याचे आदेश दिल्याचे सरकारने म्हटले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button