breaking-newsपुणे

आघाडीत मतभेद नाहीत, आम्ही जुळे भाऊ

  • …तर पालघरमध्येही चित्र वेगळे असते!

  • भाजप सरकारच्या कारभारावर लोक नाराज

  • जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार

पुणे – कर्नाटकप्रमाणे पालघरमध्ये समविचारी पक्ष एकत्र आले असते, तर भंडारा-गोंदियाप्रमाणे पालघरमधलेही चित्र असते. केवळ मतांच्या विभाजनामुळे येथे अपयश आले. समविचारी पक्षाने मतांचे विभाजन टाळले पाहिजे. असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कारभारावर लोक नाराज आहेत. आता ते मतांच्या रूपाने नाराजी व्यक्त करत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

भाजप आणि शिसेनेविरूद्धच आमची लढाई असणार आहे. आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत. आम्ही जुळे भाऊ आहेत. कोणी मोठा आणि कोणी लहान नाही. जागा वाटपाचा निर्णय मात्र वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. सध्याचा भाजपचा कारभार गोंधळाचा आहे. कोणतेच निर्णय होत नाहीत. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपच्या विजयात मागील वेळी विदर्भ एकतर्फी त्यांच्या पाठीशी होता, मात्र या निकालावरून लोकांमधील नाराजी दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सलग 15 दिवस वाढविले. त्यानंतर एक पैशांनी कमी करून भाजपने लोकांची चेष्टा केली आहे, अशी टीका पवार यांनी केली.

आता कर्तृत्त्व दाखवावे लागेल
दर वेळी विकासाच्या बाबतीत आघाडीच्या नावाने पावती फाडून कसे चालेल? चार वर्षे सत्तेत राहूनही तुम्हाला विकास कामे करता येत नसतील, तर त्याचा दोष विरोधकांना देऊन कसे चालेल? लोक हुशार आहेत. त्यांना खरे काय आणि खोटे काय हे कळते. त्यामुळे आता विरोधकांच्या नावे पावती फाडून चालणार नाही. त्यांना आता कर्तृत्त्व दाखवावेच लागेल, असा टोलाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

पालघर निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढले; त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात नक्की काय सुरू आहे हे सांगणे अवघड आहे. शिवसेनेनी आता पाठिंबा काढून घेतला, तर मात्र मुदतपूर्व निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा जेव्हा शिवसेना स्वतंत्र लढण्याची गोष्ट करते. तेव्हा भाजपकडून युतीची भाषा केली जाते. कारण शिवसेनेने सोबत सोडल्यास भाजपला विरोधी पक्षात बसावे लागेल. मोदींचा करिष्मा आता राहिला नाही. लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. काही लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. त्यांच्याकडे निष्ठा नसते. मात्र आजच्या निकालात कुंपणावर असलेले आता थांबतील. कर्नाटकमध्ये अजूनही मंत्रिमंडळ स्थापन व्हायचे आहे. भाजप गप्प बसणार नाही, त्यामुळे कायम सावध रहावे लागेल, असेही पवार म्हणाले.

धनगर आरक्षणाचे काय झाले?
बारामतीत पार पडलेल्या सभेत “पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण जाहीर करू’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या दीडशे बैठका पार पडल्या; परंतु मुख्यमंत्री आरक्षण जाहीर का करू शकले नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित करून दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवून कसे चालेल. हा लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न आहे. तो आता लोकांच्या लक्षात यायला लागला आहे, असे पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button