breaking-newsक्रिडा

आक्रमक खेळ करण्याचा निर्धार होता – अजिंक्‍य रहाणे

बंगळुरु – अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमक खेळ करण्यावर ठाम होतो. अफगाणिस्तानचा संघ जरी नवखा असला तरी त्यांना फारशी संधी द्यायची नाही आणि आक्रमक खेळ करून एकतर्फी विजय मिळवायचा, असा निर्धार सामन्यापूर्वीच आम्ही केला होता, अशी प्रतिक्रिया भारताचा हंगामी कर्णधार अजिंक्‍य रहाणे याने विजयानंतर दिली.

भारताने अफगाण संघाचा पदार्पणाच्या कसोटी सामन्यात एक डाव 262 धावांनी सहज पराभव केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा रहाणे म्हणाला की, या सामन्यातील विजय िुवशेष ठरला. देशाचे नेतृत्व करणे ही नेहमीच सन्मानाची बाब असते. आम्ही या सामन्यात आक्रमक खेळण्याचे ठरविले होते आणि तसेच घडले.भारताच्या डावात शतकी खेळीचे योगदान देणारे सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांची अजिंक्‍य रहाणेने प्रशंसा केली.

रहाणे म्हणाला की, या दोघांनी शानदार फलंदाजी केली. शिखर, मुरली, राहुल व हार्दिक यांची फलंदाजी वाखाणण्यासारखी होती. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अफगाणिस्तानचा खेळ शानदार होता. हा संघ येथून पुढे आणखीन चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. त्यांच्या फिरकी गोलंदाजांची खूपच चर्चा झाली असली तरी त्यांचा वेगवान मारा अधिक प्रभावी होता.

पहिल्या दिवशी उपाहारानंतर वेगवान गोलंदाजांनीच त्यांना यश मिळवून दिले.
हा ऐतिहासिक कसोटी सामना संपल्यानंतर विजयी भारतीय संघाची छायाचित्रे काढली जाताना रहाणेने अफगाणिस्तान संघालाही पाचारण करताच सर्वांना आश्‍चर्य वाटले. विजयादाखल मिळालेला चषक पहिलीवहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाण खेळाडूंच्या हातात देत चषकासह फोटो काढून घेण्याची विनंती रहाणेने त्यांना केली. या आगळ्यावेगळ्या खिलाडूवृत्तीबद्दल रहाणेचे सगळीकडे कौतुक होत आहे.

फलंदाजीचा आनंद लुटला – शिखर धवन 
केवळ 96 चेंडूंत 107 धावा ठोकणाऱ्या शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सध्या मी फलंदाजीचा आनंद घेत आहे, असे सांगून धवन म्हणाला की, ही खेळीही त्याला अपवाद नव्हती. हा सामना लवकर संपल्याने आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी तयारीला वेळ मिळेल. शिवाय काही दिवस चांगली विश्रांती घेता येईल. कसोटी दर्जा मिळाल्याबद्दल धवनने अफगाण संघाचे कौतुक करीत हे खेळाडू वन डे प्रमाणे कसोटीतही नावलौकिक मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button