breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अवघ्या दीड कोटींसाठी 5 लाख पुणेकर वेठीस

  • धनकवडी, कात्रज भागातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पुणे  : सिंहगड रस्त्यावरील कॅनॉलच्या कडेने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना;संबधित ठेकेदाराकडून महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी वीज वाहीनी तुटली आहे. त्यामुळे महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात या शुध्दीकरण केंद्रासाठी वीज जोडणी देण्यात आली असली तरी, ही जोडणी तकलादू ठरली असून गेल्या दहा ते 15 दिवसांपासून हे शुध्दीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे धनकवडी, कात्रज तसेच आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तुटलेल्या वीज वाहीनीच्या दुरूस्तीचा खर्च तब्बल 1 कोटी 60 लाख रूपयांचा आहे. मात्र, हा खर्च पथ विभागाने करायचा की पाणी पुरवठा विभागाने याबाबत वाद असल्याने तब्बल 5 लाख पुणेकरांच्या घशाचे पाणी पळाले आहे.

 

महावितरण आणि महापालिका प्रशासनाच्या विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा. – विशाल तांबे ( माजी स्थायी समिती अध्यक्ष)

महापालिकेने कात्रज, बिबवेवाडी तसेच सिंहगड रस्ता परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी वडगाव जलशुध्दीकरण केंद्र उभारले आहे. केंद्रशासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेतून या केंद्रासाठी निधी मिळाला होता. सुमारे 125 एमएलडी क्षमतेचे हे केंद्र आहे. या केंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी महापालिकेने महावितरणकडून स्वतंत्र वीज वाहीनी घेतलेली होती. दोन आठवड्यांपूर्वी खडकवासला कलव्यावरून महापालिकेचे रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना ही मुख्य वाहीनी ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे तुटली आहे. त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, ही अत्यावश्‍यक बाब असल्याने महावितरणने ती दुरूस्त न करता पालिकेच्या पथ दिवे तसेच इतर वापरासाठी असलेल्या एक्‍स्प्रेस वीज वाहीनीतून या जलशुध्दीकरण केंद्राला वीज पुरवठा दिला. तसेच स्वतंत्र वीज जोडणीची वाहीनी दुरूस्त करायची असल्यास महापालिकेने 1 कोटी 60 लाख रूपयांचा खर्च महावितरणला द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र, ही रक्कम पाणी पुरवठा विभागाने द्यायची की पथ विभागाने या वरून एकमत होत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून या शुध्दीकरण केंद्राचे कामच ठप्प झाले आहे. त्यामुळे या शुध्दीकरण केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा फटका दक्षिण पुण्यातील तब्बल 5 लाख नागरिकांना बसला आहे.

काय आहे नेमकी समस्या
महावितरणने महापालिकेच्या इतर वापराच्या एक्‍सप्रेस वीज वाहीनीवरून ही जोडणी दिली आहे. या वाहीनीवरच या भागातील महापालिकेचे पथदिवे आहेत. सायंकाळी एकाच वेळी महापालिकेचे पथदिवे आणि जलशुध्दीकरण केंद्राच्या मोटारी सुरू होताच; ही वाहीनी कुठे ना कुठे ट्रिप होते अथवा मोटारीसाठीचा वीज भार जास्त असल्याने पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही त्यामुळे या मोटारी बंद पडतात, त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत होण्यास सात ते आठ तास लागतात, त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्राचे कामकाजच ठप्प झाले असून जेवढता वेळात शुध्दीकरण होते. तेवढेच पाणी पालिकेकडून टप्प्या टप्प्याने नागरिकांना दिले जात आहे. मात्र, हे या लोकसंख्येच्या 15 ते 20 टक्केच आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

दुरूस्तीच्या खर्चावरून नागरिक वेठीस 
या जलशुध्दीकरण केंद्रासाठी असलेल्या या वीज वाहीनीच्या दुरूस्तीच्या खर्चावरून सुमारे 5 लाख नागरिक वेठीस आहेत. ही वाहीनी ठेकेदाराच्या चुकीने तुटली असल्याने महापालिकेनेच त्याची दुरूस्ती करून द्यावी अशी मागणी महावितरणने केली आहे. त्यासाठी 1 कोटी 60 लाखांच्या खर्चाचे पत्र पालिकेस देण्यात आले आहे. तर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हे पथ विभागाचे काम सुरू होते. त्यामुळे ठेकेदाराकडून पथ विभागाने पैसे वसूल करून ही दुरूस्ती करावी अशी भूमिका घेतली तर पथ विभागाने हा विषय पाणी पुरवठयाशी संबधित असून त्यांनीच हा खर्च करावा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्वतंत्र वीज वाहीनीच्या दुरूस्तीचा खर्च कोणी करावा हे निश्‍चित होत नसल्याने नागरिकांचे मात्र पाण्यासाठी चांगलेच हाल होत आहेत.
———————————–

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button