अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा
तेहरान | महाईन्यूज
इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना ‘सुपुर्द ए खाक’ केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या तळांवर एकूण 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यात 80 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केलेला आहे.
मंगळवारी रात्री इराणने क्षेपणास्रांद्वारे हल्ला करत अमेरिकेच्या इराकमधील तळांना लक्ष्य केलेले होते. दरम्यान, इराणकडून क्षेपणास्रांद्वारे अमेरिकेच्या तळांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आलेला आहे. तसेच या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत पेंटागॉनकडून माहिती घेतली जात आहे.