breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांचे सोमवारी संध्याकाळी दादर येथे राहत्या घरी निधन झाले. ते गेले दीड वर्ष फुप्फुसांच्या संसर्गाने आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ८१व्या वर्षांचे होते.
डॉ. अधिकारी यांनी भाभा अणु संशोधन केंद्रामधून पदवी प्राप्त केली होती. अभिनायाची मुळातच आवड असल्याने ते महाविद्यालयीन जीवनामध्ये नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील त्यांची भूमिका रसिकांच्या मनात कायमची नोंदली गेली. अमोल पालेकर यांचे ‘जुलूस’ हे नाटक, ‘संध्याछाया’, ‘हसवाफसवी’, ‘ढोलताशे’ या नाटकांमध्ये त्यांनी लहानशा मात्र लक्षवेधी भूमिका केल्या. तसेच १६ मराठी आणि हिंदी चित्रपट आणि सात मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या.