breaking-newsमनोरंजन

अपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…

बॉलीवूडची मोहिनी, धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याने तेजस प्रभा विजय देऊसकर दिग्दर्शित ‘बकेट लिस्ट’ बद्दल सर्वांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली होती. ‘अजिंक्‍य’, ‘प्रेमसूत्र’ असे सामान्य दर्जाचे चित्रपट दिलेल्या दिग्दर्शका सोबत काम करण्यास माधुरीने होकार का दिला असावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला होता, हा चित्रपट बघितल्यावर जाणवते की माधुरीला मराठीत पाहण्याची इच्छा पूर्ण झाली असली तरी प्रेक्षकांच्या अपेक्षाची “बकेट’रिकामीच राहिली आहे.

“बकेट लिस्ट’ही कथा आहे पुण्यातील मधुरा साने (माधुरी दीक्षित) या सामान्य गृहिणीची. आपले घर आणि संसार याशिवाय तिचे आयुष्य नसते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच मधुरावर हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया झालेली आपल्याला पाहायला मिळते. तिला कोणाचे हृदय मिळाले आहे याची तिला उत्सुकता असते. त्यामुळे ती त्याचा शोध घेत सई देशपांडेच्या घरी पोहोचते. सईच्या मृत्यूने तिची आई (रेणुका शहाणे) वडील (मिलिंद फाटक) आणि भाऊ साहिल (सुमेध मुद्गलकर) पूर्णपणे ढासळलेले असतात. सई ही स्वच्छंद मनाची, आपले आयुष्य आपल्याप्रमाणे जगणारी मुलगी असते.

तिच्या 21 व्या वाढदिवसाआधी तिला तिच्या आयुष्यात काय काय करायचे याची तिने “बकेट लिस्ट’ तयार केलेली असते. तिची ही बकेट लिस्ट मधुरा पूर्ण करायचे ठरवते. सईच्या या बकेट लिस्ट मध्ये अनेक नवीन गोष्टी आहेत ज्या मधुराने केलेल्या नाहीत, तिच्या वयाच्या मानाने कठीण आहेत. यामुळे मधुराच्या आयुष्याला एक प्रकारची कलाटणी मिळते, सईची बकेट लिस्ट पूर्ण करताना काय घडते हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.

दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी अवयव दान हा सिनेमाचा विषय आणि मधुरीची निवड यात बाजी मारली आहे, मात्र फ़क्त या दोन गोष्टी उत्तम सिनेमा निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरत नाहीत याची जाणीव प्रेक्षकांना अवघ्या दहाव्या मिनिटाला होते. संकलन, पटकथा यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अनेकदा कथेतील घटना ओढताण करून पूर्ण केल्याचे दिसते, मध्यांतरा नंतर कथा अगदी रास्ता चुकली आहे. संसारात गुंतलेली स्त्री कुटुंबाच्या व्यापात आपले स्वतःचे आयुष्य जगायचेच विसरून जाते. हे आयुष्य नव्याने जगण्याची एक उमेद देणारा हा चित्रपट काही वर्षा पूर्वी आलेल्या श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’, विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलु’, कंगना च्या ‘क्वीन’ची आठवण करून देतो.

एका दृश्‍यात वंदना गुप्ते एका माणसाशी मराठी मिश्रित हिंदीत बोलत असतात. ते दृश्‍य रंगात येत असताना अचानक वंदना गुप्ते आणि सुमित राघवन यांच्यात संवाद सुरू होतो. मधुरा आणि तिच्या नवऱ्यात सगळे काही आलबेल सुरू असताना अचानकपणे त्यांच्या नात्यात कटुता दाखवण्याची खरंच गरज होती का? सईंच्या भावाचा स्वभाव एकदम बदलतो अशा घटना खटकतात.

कलाकारांच्मा अभिनयाबद्दल सांगायचे तर माधुरी दीक्षितला आपण बॉलीवुडमध्ये जसे पाहिले आहे तशीच ती इथे दिसते मात्र मधुरा साने साकरताना तिचा काहीसा गोंधळ उडाला आहे, तुलनात्मक सांगायचे तर वंदना गुप्ते, शुभा खोटे, सुमित राघवन हे माधुरीला वरचढ ठरले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रेणुका शहाणे यांच्या वाट्याला छोटी भूमिका आहे, दिलीप प्रभावळकर यांना वाया घालवले आहे, इतर कलाकरांच्या भुमिकाही चांगल्या झाल्या आहेत.
चित्रपटाचे संगीत ठीक आहे, माधुरीच्या या पहिल्या मराठी फिल्म बद्दल एकंदरीत सांगायचे तर तीला मराठीत बघण्याची तिच्या चाहत्यांची इच्छापूर्ति झाली असली तरी चित्रपटा बद्दल ची अपेक्षा पूर्ती होत नाही, यामुळे माधुरीचे चाहते असाल तर फार अपेक्षा न ठेवता हा चित्रपट पाहण्यास हरकत नाही.

चित्रपट- बकेट लिस्ट 
निर्मिती – धर्मा प्रोडक्‍शन, दार मोशन पिक्‍चर्स
दिग्दर्शक- तेजस प्रभा विजय देऊस्कर
कलाकार – माधुरी दीक्षित, सुमित राघवन, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, शुभा खोटे, सुमेध मुद्गलकर, रेशम टिपनीस
रेटिंग -2.5

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button