breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अपयश झाकण्यासाठी भाजप खासदारांची ‘गांधीगिरी’

  • राज्यसभा, लोकसभा कामकाज तहकुबिची नामुष्की
  • विरोधकांच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषणाची तयारी

पिंपरी- निर्विवाद बहुमत असतानाही संसदेत देशाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात विरोधकांनी कडाडून विरोधक करत दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपला तब्बल २४८ तास कामकाज तहकूब ठेवावे लागले. याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदारांनी ‘गांधीगिरी’चा मार्ग अवलंबला आहे. प्रत्येक खासदार आपापल्या परीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी कोल्हापूर येथे गांधीगिरी मार्गाने उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन्ही सभागृहात मिळून ७८ तास चालले. तर २४८ तास कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, लोकसभेत ५ आणि राज्यसभेत १ विधेयक मंजुर करण्यात आले, अशी माहितीही खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शहर प्रवक्ते अमोल थोरात, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक संदीप वाघेरे, उत्तम केंदळे, स्वीकृत नगरसेवक बाबू नायर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, नगरसेवक विलास मडिगेरी, संजीवनी पांडे, विजय शिनकर, नगरसेवक नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले की, संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज २३ तर राज्यसभेचे कामकाज २८ टक्केच चालले. पहिल्या सत्रात लोकसभेचे कामकाज अवघे चार टक्के तर राज्यसभेचे कामकाज आठ टक्के चालले. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिल २०१८ रोजी काही काळासाठी तहकूब करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात लोकसभेच्या ७ आणि राज्यसभेच्या ८ बैठका झाल्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १० तास ४३ मिनिटे चर्चा झाली. राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणांवरील चर्चेला प्रारंभ अमित शाह यांनी केला. १ फेब्रुवारी २०१८ रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा केली. लोकसभेत १२ तास १३ मिनिटे तर राज्यसभेत ९ तास ३५ मिनिटे चर्चा झाली. मात्र, विरोधकांनी कडाडून विरोध केल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज 248 तास तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली. विरोधकांच्या निषेधार्थ भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदार संघात एक दिवसिय लाक्षणिक उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला आहे. मी कोल्हापूर येथे जाऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे साबळे यांनी सांगितले.

महापौर काळजे, आमदार लांडगे यांची अनुपस्थिती
भाजपचेच पदाधिकारी आपल्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करत असल्याची सल महापौर नितीन काळजे यांच्या मनामध्ये कायम असल्याचे दिसते. त्यातूनच त्यांनी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली नसल्याचे बोलले जात आहे. तथापि, महापौरांचे नेते आमदार महेश लांडगे हे देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. त्यामुळे भोसरीचा गट भाजपमधील काही नेत्यांवर चांगलाच नाराज झाल्याचे दिसते. तर, पिंपरी विधानसभा मतदार संघावर दावेदारी दाखविणा-या स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे आणि सरचिटणीस सारंग कामतेकर हे दोघे देखील परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजप अंतर्गत नाराजीचे वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button