breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अनियंत्रित काजवा महोत्सवांवर नियंत्रण आणणार!

काजव्यांच्या माद्या नष्ट होण्याचा धोका

काजवा महोत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या अनियंत्रित पर्यटनाला येत्या काळात चाप लागण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी काजव्यांचा झगमगाट पाहायला हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. झाडांच्या अतिजवळ जाणे, छायाचित्रणासाठी फ्लॅशचा वापर करणे, महोत्सवाच्या कॅम्पिंगसाठी अतिप्रकाशाचा वापर करणे असे अनेक गैरप्रकार आढळतात. यातील काही ठिकाणे जंगलांचा भाग असल्यामुळे पर्यटनात गैरप्रकार आढळल्यास यापुढे काजवा महोत्सवांवर नियंत्रण आणले जाईल, प्रसंगी बंदी घालण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळ्याची चाहूल हा काजव्यांच्या प्रजननाचा काळ असतो. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास उर्वरित काळ कोषात राहणारे काजवे पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा संचार करू लागतात. याच काळात सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात अनेक ठिकाणी काजवा महोत्सवांची चलती असते. मे महिन्याच्या अखेरीस हजारोंच्या संख्येने पर्यटक काजव्यांचा झगमगाट पाहायला गर्दी करतात. यातील अनेक ठिकाणे संरक्षित जंगलाचा भाग असतात. ‘राखीव जंगलाचा भाग असणाऱ्या ठिकाणी अनियंत्रित पर्यटन सुरू असेल तर त्यावर नियंत्रण आणले जाईल. गरज पडेल तेथे बंदीदेखील घालण्यात येईल. पर्यटकांच्या कॅमेरा फ्लॅशचा परिणाम काजव्यांच्या प्रजननावर होऊ शकतो. त्यामुळे अनियंत्रित पर्यटन त्रासदायक ठरू शकते. मागील वर्षी ताम्हिणी, अंधारबन अशा ठिकाणी अनियंत्रित पर्यटनामुळे वनविभागाने गिरिभ्रमण, पदभ्रमणाला बंदी घातली होती. तशाच प्रकारे काजवा महोत्सवाच्या ठिकाणांवरदेखील नियंत्रण आणले जाईल,’ असे पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी सांगितले.

‘काजवा महोत्सवाच्या दरम्यान अनेक पर्यटक काजव्यांनी फुललेल्या झाडांच्या अत्यंत जवळ जातात. उडणारे काजवे नर असतात. तर मादी काजवे कायमच अळीच्या स्वरूपात जमिनीखाली असतात. पर्यटकांच्या अनियंत्रित वावरण्याने मादी काजवे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे हे पर्यटन नियंत्रित असणे गरजेचे आहे,’ असे कीटकतज्ज्ञ डॉ. अमोल पटवर्धन यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत सुरू झालेल्या काजवा महोत्सवांमुळे अनेक गावांमध्ये होम स्टे, कॅम्पिंग वगैरेच्या सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच यातून व्यापारी पर्यटनाने चांगलाच जोर पकडला आहे. अनेक स्थानिकांसाठी मर्यादित काळासाठी रोजगाराचा पर्यायदेखील निर्माण झाला आहे. ही बाब चांगली असली तरी त्यातील गैरप्रकारांना आळा घालणे आणि नियंत्रण आणणे गरजेचे असल्याची मागणी अनेक पर्यावरणप्रेमींकडून सध्या केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button